पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला उच्चक्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) हा राजकीय सोयीसाठी वारंवार बदलण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळे तो पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून तो मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याची गरज असताना, सर्वसाधारण सभेत पुन्हा त्याच्या मार्गात बदल केल्याने हा मार्ग रखडण्याची शक्यता आहे.

पुणे शहराच्या २०१७ मध्ये मंजूर विकास आराखड्यात ३६ किलोमीटर लांबीचा आणि २४ मीटर रुंदीचा हा मार्ग दाखविण्यात आला आहे. या मार्गाचा आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेकडून सल्लागार कंपनीचीदेखील नियुक्ती करण्यात आली. सल्लागार कंपनीने या मार्गाचा तांत्रिक अहवाल महापालिकेला यापूर्वीच सादर केला. परंतु, या मार्गात बारा ठिकाणी बदल सूचविण्यात आले. या बदलास २०१९ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. या बदलावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या. सुमारे पाचशेहून अधिक दाखल हरकतींवर सुनावणी घेऊन तो अंतिम करण्यात आला. सप्टेंबर २०१९ मध्ये ही मार्ग अधिसूचित करून अधिसूचनाही काढण्यात आली.

अधिक वाचा  पाणी कपातीचा विचार नाही; उलट फडणवीसांच्या काळातच पाणी कपात झाली!

असे असताना लोहगाव आणि वडगाव शेरी या ठिकाणाच्या मार्गात बदल करण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी शहर सुधारणा समितीपुढे मांडून मान्य करण्यात आला. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत खास सभेत त्यास मान्यता दिली. ही मान्यता देताना या बदलासंदर्भात पुन्हा एकदा हरकती-सूचना मागवून त्यावर सुनावणी घेऊन, तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे नव्याने मार्गात केलेल्या या बदलामुळे पुन्हा सर्व प्रक्रिया राबवावी लागणार असल्याने त्यामध्ये आणखी वेळ जाणार आहे.

या रस्त्याच्या मार्गात वारंवार बदल केले जात आहेत. यापूर्वी नेहरू रस्त्यावरील डायस प्लॉट ते गंगाधाम चौकदरम्यान उड्डाणपूल उभारण्याच्या राजकीय नेत्यांच्या हट्टापायी बदल करण्यात आला. त्यासाठी प्रस्तावित मार्गात बदल करून तो कॅनॉलच्या कडेने नेण्यात आला. आता पुन्हा लोहगाव आणि वडगाव शेरी येथील मार्गात बदल केला आहे. यापूर्वी हा रस्ता विकसित करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. मात्र, त्या चढ्या दराने आल्यामुळे रद्द झाल्या. त्याऐवजी या मार्गावर निओ मेट्रो प्रकल्प राबविण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी दिल्या होत्या. त्यावर महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. निओ मेट्रो प्रकल्प राबवायचा झाला, तर वळणावळणाचा रस्ता योग्य ठरत नाही. परंतु, वारंवार मार्गात बदल केल्याने सर्व प्रकल्प राबविण्यात अडचणीत येऊ शकतो, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रकल्प कागदावरच राहण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा  पुण्यात भरदिवसा सहा गोळ्या झाडून काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

पुणे शहराचा ट्रॅफिक ॲण्ड ट्रान्स्पोर्ट प्लॅन १९७५ मध्ये तयार करून सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यामध्ये या रस्त्याचा समावेश होतो. १९८२ मध्ये शहराचा विकास आराखडा तयार करताना, तो आहे तसा दर्शविण्यात आला. त्यानंतर ८२ च्या आराखड्याचे पुनर्विलोकन करताना २०१७ च्या आराखड्यात तो दर्शविण्यात आला. ४६ वर्षांनंतरही हा रस्ता होऊ शकलेला नाही. तो मार्गी लावण्याऐवजी वारंवार त्यामध्ये बदल केला जात आहे. हे शहराच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही.

– रामचंद्र गोहाड, माजी संचालक, नगर रचना