पुणे – बसची वाट पाहत थांबलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर मेट्रोचे लोखंडी बॅरीकेड पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात मेट्रोचे काम पाहणाऱ्या यू. आर. सी कंपनीसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारूती लक्ष्मण नवस्कर (६४, रा. कोथरूड) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा मयूर नवस्कर यांनी तक्रार दिली आहे. ही घटना ९ सप्टेंबर रोजी वनाज बसस्टॉपवर घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ९ तारखेला ज्येष्ठ नागरिक पिरंगूट येथे जाण्यासाठी वनाज बसस्थानकावर बसची वाट पाहत थांबले होते.

अधिक वाचा  "पवारांना अडकवण्याचाच ममतांचा डाव, काँग्रेसविरोधातही कट सुरूच"

या दरम्यान तेथे मेट्रोच्या कामाकरीता लावण्यात आलेले लोखंडी बॅरीकेड ज्येष्ठाच्या अंगावर पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षेत हयगय केल्याप्रकरणी पोलिसांनी सुरक्षा पुरविणाया ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड करीत आहेत.