नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पूरस्कृत दहशतवाद्यांच्या ज्या कुरापत्या सुरु आहेत त्याच्या पार्श्वमीवर टी-ट्वेंटी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशांमधील संबंध चांगले नाहीत. तर मग या विषयावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असं गिरिराज सिंह म्हणाले आहेत.

T-20 त भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान विरोधात 

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पहिलाच सामना पाकिस्तान विरोधात खेळवण्यात येणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधीच हा सामना होऊ नये, अशी मागणी आता देशभरातून होऊ लागली आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार घडवून आणला जातोय. काश्मीरच्या घाट परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वारंवाल लक्ष्य केलं जातंय. त्यांच्यावर हल्ला केला जातोय.

अधिक वाचा  समुद्रपातळीत तिप्पट वाढ; या देशाचे अस्तित्वच धोक्यात; पाण्यातूनच जगाला आवाहन

काश्मीरमध्ये गेल्या 10 दिवसांत 13 दहशतवाद्यांचा खात्मा
गेल्या 10 दिवसांमध्ये भारतीय सैन्याचे अतिरेक्यांसोबत 9 वेळा चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत 12 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत असलं तरी अतिरेक्यांच्या कारवाया काही कमी होताना दिसत नाहीय. पाकिस्तान पूरस्कृत दहशतवादी वारंवार काश्मीरमध्ये घुसखोरी करुन हिंसाचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

भारत-पाकिस्तान सामना नकोच, चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांची मागणी
चित्रपट निर्माते आणि भारतीय चित्रपट-दूरचित्रवाणी दिग्दर्शक संघटनेचे अध्यक्ष अशोक पंडीत यांनी देखील भारत-पाकिस्तान सामना होऊ नये, अशी मागणी ट्विटरवर केली आहे. अशोक यांनी त्यांचा व्हिडीओ ट्विट करत ही मागणी केली आहे. यावेळी ते पाकिस्तानवर प्रचंड टीका करतात. पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले होत असताना भारत-पाकिस्तान सामना खेळवलं जाणं हे लज्जास्पद आहे, असं अशोक म्हणाले आहेत.

अधिक वाचा  अवघ्या चार आणि सात वर्षाच्या चिमुकल्यांनी पार केला मलंग गड

अशोक पंडीत नेमकं काय म्हणाले?
“पाकिस्तान एक दहशतवादी देश आहे. पाकिस्तान अतिरेक्यांना जन्माला घालतो आणि त्यांना ट्रेन करतो. पाकिस्तान आमच्या कित्येक निष्पापांच आयुष्य उद्ध्वस्त करण्याला, आमच्या भारतीय सैनिकांच्या हत्येला जबाबदार आहे. हा देश संपूर्ण जागासाठी कॅन्सर आजार आहे. आम्ही आजही या क्षणी देखील पाकिस्तानामुळे संघर्ष करतोय. रोज हत्या होत आहेत. आमच्या काश्मीरच्या धर्तीवर रोज आमचे जवान आणि सैनिकांना मारलं जातंय. अशा भयानक परिस्थितीत आमचा देश त्या देशासोबत टी-ट्वेंटी खेळत असेल तर या जगातील सर्वात लज्जास्पद गोष्टी कोणती नसेल. यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे खेळ खेळणं हे आमच्या सैनिकांना अपमान आहे”, असं अशोक पंडीत म्हणतात.

अधिक वाचा  पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण; निर्बंध लादणार का? आयुक्त म्हणाले…

“भारत-पाकिस्तान सामना खेळवणं म्हणजे आमच्या जवानांच्या कुटुंबियांच्या जखमांना आणखी घाव घालण्यासारखी गोष्ट आहे. जे निष्पाप नागरीक रस्त्यांवर मारले गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी ही एक कानशिलात आहे. मी आमच्या क्रिकेट मंडळ, सरकारला विनंती करतो की, हा सामना होऊ देऊ नका. जोपर्यंत परिस्थिती चांगली होत नाही. पाकिस्तानची वागणूक बदलत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचा खेळ खेळला जाऊ शकत नाही. तसेच त्यांच्यासोबत कोणताही व्यापारी करार होऊ शकत नाही. आम्ही एकीकडे मरतोय आणि दुसरीकडे मैदानात त्यांच्यासोबत खेळतोय”, असंदेखील पंडीत म्हणाले आहेत