पुणे : मुंबईनंतर पुणे महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच फेब्रुवारीमध्ये पुणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणधुमाळीला आतापासूनच सुरुवात झालीय. उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत असे बडे चेहरे आता पुणे महापालिका निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे या बड्या नेत्यांपैकी कोण कुणावर भारी ठरणार याकडे पुणेकरांसह राज्याचं लक्ष लागलं आहे.

पुणे महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे चंद्रकात पाटील पुण्यातला गड राखणार का? की चंद्रकांतदादांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा भारी पडणार? राज ठाकरे मनसेच्या इंजिनाला पुण्यात गती देणार का? पुण्यात शिवसेनेचा महापौर बसवण्यात संजय राऊतांना यश येणार? अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुणेकरांचा खल सुरु असल्याचंही पाहायला मिळत आहे. यंदा पुणे महापालिकेची निवडणूक दिग्गजांच्या प्रतिष्ठेचा विषय बनणार याची झलक आतापासूनच पाहायला मिळत आहे. कारण यंदा पुण्यात चार प्रमुख चेहरे मैदान मारण्यासाठी कामाला लागले आहेत.

अधिक वाचा  ‘मोदींची गॅरंटी 24 कॅरेट सोन्याइतकी शुद्ध’ भाजप आश्वासनं पूर्ण करणारा पक्ष; संकल्पपत्रातून ही आश्वासनं?

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेही कामाला

पहीला चेहरा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे. मागील दोन महिन्यात राज ठाकरेंनी अनेक वेळा पुण्याचा दौरा केलाय. या दौऱ्यात पक्ष संघटनेबरोबरचं महापालिका निवडणूक ताकदीनं लढवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गेल्या दीड वर्षापासून दर शुक्रवारी शहरात आढावा बैठक घेत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडवर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येणार, असा दावाही त्यांनी केला आहे. तर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चार दिवसांपूर्वीच महापौर पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुढील महापौर शिवसेनेचाच असेल असा दावा राऊत यांनी केलाय. तर चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात भाजपच्या नगरसेवकांची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेच्या माध्यमातून मिशन 2022 अंतर्गत महापालिकेतील सत्ता कायम राखण्याचा मनसूबा जाहीर केलाय.

अधिक वाचा  नाशिकच्या जागेची महायुतीमध्ये सस्पेन्स कायम; मोठा नेता ३ दिवसांपासून तळ ठोकून तर 2 प्रबळ मुंबईवारीवरच

भाजपला टक्कर देण्यासाठी पुण्यात आघाडी एकत्र लढणार?

पुणे महापालिका ताब्यात घेण्यासाठी आता प्रत्येक पक्ष कामाला लागलाय. पुण्यात राज ठाकरेंनी दंड थोपटल्यानं महापालिका निवडणूकीत यंदा मनसेचंही तगडं आव्हान असणार आहे. मात्र, भाजपच्या हातून सत्ता खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी बैठक आयोजित केली असल्याची माहिती शहराध्यक्षांनी दिलीये. पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजपसमोर मोठं आव्हान असणार आहे. याबाबत पुढील आठवड्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे.

पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप – 99
राष्ट्रवादी काँग्रेस – 45
काँग्रेस – 9
शिवसेना – 10
मनसे – 02
अपक्ष – 03
एकूण – 168