नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज दिल्लीत सुरू आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या बैठकीमधून सोनिया गांधींनी पक्षातील जी-२३ नेत्यांना स्पष्ट आणि सूचक संदेश दिला आहे. पक्षाची पूर्णवेळ अध्यक्षा मीच आहे, असे सोनिया गांधींनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांनी पक्षातील असंतुष्ट नेत्यांचा गट असलेल्या जी-२३ ला खरमरीत उत्तर दिले आहे. सोनिया गांधी यांनी बैठकीच्या सुरुवातील उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, जर तुम्ही मला असे सांगण्याची परवानगी दिली तर मी सांगते की, मीच काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्षा आहे. माझ्यासाठी माध्यमांच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल यांनी पक्षामध्ये निर्णय कोण घेत आहे, हे समजत नसल्याचे विधान केले होते.

अधिक वाचा  सुप्रीम कोर्टाची ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

सोनिया गांधी म्हणाल्या की, आम्ही कधीही लोकमहत्त्वाच्या मुद्द्यांवर टिपणी करण्यास नकार दिलेला नाही. यावेळी पक्ष संघटनेच्या निवडणुकीबाबतही सोनिया गांधी यांनी भाष्य केले. पक्ष संघटनेच्या निवडणुकीचा पूर्ण आराखडा तुमच्यासमोर येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

खुल्या वातावरणातील चर्चेला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. मात्र त्यांच्यासाठी माध्यमाच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही. या बैठकीत प्रामाणिक आणि स्वस्थ वातावरणात चर्चा झाली पाहिजे. मात्र या बैठकीच्या बाहेर काय गेले पाहिजे याचा निर्णय कार्यकारी समितीने सामूदायिकपणे घेतला पाहिजे, असा सल्लाही सोनिया गांधी यांनी दिला.