पंढरपूर : शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन चर्चा फिसकटली आणि त्यानंतर युती तुटली. भाजप सोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली. युती तुटल्यापासून शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. यातच आता शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संयमाने भूमिका घेतली असती तर शिवसेनेचे 56 आमदार हे भाजपसोबत असते असं वक्तव्य शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत काहीना काही टीका करत असतात, त्याच वेळेस ते संयमाने वागले असते तर त्यांच्यासोबत शिवसेनेचे 56 आमदार दिसले असते असं वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. गुलाबराव पाटील यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

अधिक वाचा  आंतरविभागीय हॉकी स्पर्धेत पुणे ग्रामीण संघ विजयी

विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी गेलेल्या गुलाबराव पाटील यांनी एक साकडं घातलं आहे. कोरोनाचं संकट कमी झालं आहे, संकट असेच कमी होऊ दे असं विठ्ठल रुक्मिणी चरणी गुलाबराव पाटील यांनी साकडं घातले. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, मात्र हे पॅकेज शेतकऱ्यांना अपुरे असल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली.

भाजपमधून शिवसेनेत आलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये निघाले आहेत. याविषयी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं, या नगरसेवकांना भाजपने अपात्रतेची भीती दाखवत आहे.

जळगावात शिवसेनेला दुहेरी धक्का

जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याची योजना हाणून पाडत काँग्रेसनं वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिवसेनेतून नगरसेवकांच्या गळतीलाही सुरुवात झाली आहे. सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र काँग्रेस या प्रयत्नांत समाधानी नसल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून समोर येत होतं. अखेर काँग्रेसनं जळगावातील सर्वपक्षीय आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून पत्रकार परिषद घेत आपल्या या निर्णयाची माहिती दिली आहे.

अधिक वाचा  स्थानिक स्वराज्य संस्था: ओबीसी जागांच्या निवडणुका ही स्थगित - राज्य निवडणूक

शिवसेनेला जळगावमध्ये दुहेरी धक्का बसला आहे. एकीकडे जळगावातील सर्वपक्षीय आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. तर दुसरीकडं इतर पक्षातून शिवसेनेत आलेले नगरसेवक स्वगृही परतत आहेत. भाजपातून आलेले 10 नगरसेवक पुन्हा मूळ पक्षात जात असून 3 नगरसेवक शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेस का पडली बाहेर?

सर्व पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढण्याची योजना सफल होण्याची शक्यता दिसत असतानाच काँग्रेसनं बाहेर पडत बंडाचं निशाण उगारलं आहे. सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची कल्पना चांगली होती. मात्र असं करत असताना सर्वांना समान अधिकार मिळण्याची गरज आहे. सर्व निर्णय एकतर्फी होणार असतील, तर आम्हाला अशा आघाडीत रस नसल्याचं सांगत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.