नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी एक दावा केला आहे. महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान तुरुंगात असताना ब्रिटीशांकडे दया याचिका केली होती. असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. ‘वीर सावरकर : द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे. राजनाथ सिंह यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याच कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे सुद्धा उपस्थित होते.

अधिक वाचा  पुण्यात भरदिवसा सहा गोळ्या झाडून काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

काय म्हणाले राजनाथ सिंह?

राजनाथ सिंह म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात वेळोवेळी खोटं पसरविण्यात आले. वेळोवेळी असे सांगण्यात आले की, तुरुंगातून मुक्त होण्यासाठी ब्रिटिश सरकारपुढे दया याचिका केली पण महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन अंदमान तुरुंगात असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांकडे दया याचिका केली होती.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करण्याचा नेहमीच प्रयत्न झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक महान स्वातंत्र्यसैनिक होते, सावरकर एक महान नायक होते आणि भविष्यातही राहतील असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. हे पुस्तक केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी लिहिले आहे.

अधिक वाचा  रात्रीचा गारवा वाढण्याची शक्यता; आठवडाभर कोरडे हवामान

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी हिंदू हा शब्द धर्माशी नाही तर संस्कृतीशी संबंधित होता. वीर सावरकरांचा द्वेष स्वीकारला जाऊ शकत नाही. 2003 मध्ये संसदेत वीर सावरकरांचा फोटो लावण्यास राजकीय पक्षांनी विरोध केला होता. राजकीय पक्षांचे नेते त्या कार्यक्रमाला आले नाहीत, तुम्ही असा द्वेष का करता? असा सवालही राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला.

सावरकरांना बदनाम करण्याचा घाट – मोहन भागवत

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत आजही योग्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नाहीये. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतची माहिती त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकातून मिळू शकेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बदनाम करण्याचा घाट घातला. त्यानंतर आता स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, योगी अरविंद यांना बदनाम करण्याचा घाट घालण्यात येईल असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं आहे.