बंद सत्ताधारी पक्षांनी पुकारला असल्याने राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. प्रमुख शहरातील बाजारपेठा, दुकानं आणि मार्केटयार्डमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी बंदविरोधात नाराजी व्यक्त केली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं. रास्ता-रोको, जाळपोळ आणि काही ठिकाणी जबरदस्तीने दुकानं बंद केल्याचे प्रकारही घडले. राज्यकर्त्यांनी शेतकर्यांच्या मुद्द्याचं कारण देत बंद केला. पण या बंदने महाविकास आघाडीने काय साध्य केलं? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

बंद यशस्वी झाला- महाविकास आघाडी

महाराष्ट्र बंदची हाक सत्ताधाऱ्यांनी दिली होती. त्यामुळे राज्यभरात व्यापारी वर्गाने सावध पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं. व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा जाहीर करत प्रमुख बाजारपेठा आणि दुकानं बंद ठेवली होती. त्यामुळे महाविकास आघाडीने बंद यशस्वी झाल्याचा दावा केलाय.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “बंद यशस्वी झाला. लोकांनी दाखवून दिलं ते महाविकास आघाडीसोबत आहेत.” सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर दिला होता. भाजपने यावर कडाडून टिका केली.

“सत्तेत असताना बंद पुकारणे ही पहिलीच घटना आहे. बंदबाबत लोकांमधील उद्रेक निवडणुकीत दिसेल,” असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. भाजपच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतात, “बंदचा सरकारशी संबंध नाही. लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ आम्ही कार्यकर्ते म्हणून रस्त्यावर उतरलो होतो.” ते पुढे म्हणाले, “राज्यभरात बंद शांततेत पार पडला. शेतकर्यांसाठी पुकारण्यात आलेला बंद यशस्वी झालाय.”

बंद हा ढोंगीपणाचा कळस- देवेंद्र फडणवीस

भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या या बंदचा विरोध केला. हा बंद म्हणजे ढोंगीपणाचा कळस आहे. बंद करणारी तीच मंडळी ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला, अशी टीका फडणवीस यांनी केली. ते पुढे म्हणाले, “दमदाटी करुन लोकांना बंद ठेवायला प्रवृत्त केले जात आहे. आत्ता कुठे दुकाने सुरू होत होती, छोट्या व्यावसायिकांची गाडी रुळावर यायला सुरुवात झाली होती. मात्र पुन्हा या सरकारने दुकाने बंद केली आहे.”

अधिक वाचा  दुसऱ्या मात्रेकडे १ कोटीची पाठ; ५ जिल्ह्यामध्येच बहुतांश लसीकरण

बंदमधून काय साध्य झालं?

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार गेल्याकाही दिवसांपासून भाजपच्या रडारवर आहे. विशेषत: शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. भाजप नेते सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत.

महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद करून आम्ही एकत्र आहोत असं दाखवून दिलंय? महाविकास आघाडीने काय साध्य केलं? हा प्रश्न आम्ही राजकीय जाणकारांना विचारला. वरिष्ठ राजकीय विश्लेषक दीपक भातूसे म्हणतात, महाराष्ट्र बंद करून महाविकास आघाडीने प्रमुख तीन गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला.

सेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चौकशीमुळे दोन्ही पक्षांवर दवाब होता. यापैकी एक पक्ष सरेंडर होईल अशी चर्चा सुरू होती. भाजपविरोधात कोणी आंदोलन करेल असं वाटत नव्हतं. पण बंदच्या माध्यमातून आम्ही भाजप विरोधात आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला.

हे तिन्ही पक्ष सत्ताधारी असल्याने कार्यकर्ते अजिबात आक्रमक नव्हते. या आंदोलनामुळे कार्यकर्त्यांना चैतन्य मिळालं. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची संधी मिळाली. तीनही पक्षांची तोंडं विविध दिशांना आहेत असा आरोप कायम भाजपकडून होतो. या आंदोलनात तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र दिसले. त्यामुळे आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

राजकीय विश्लेषक म्हणतात, “बंद करून काहीच साध्य झालं नाही. उलट महाविकास आघाडीने लोकांची सहानुभूती गमावली. या तिन्ही पक्षांना बंदचा फायदा नाही तोटाच झालाय.”

राजकीय जाणकारांच्या मते लखीमपूर खिरीच्या मुद्दयावर शेतकरी वर्गाची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न होता. पण लोकांनी लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नाही. केंद्रीत तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेर्यातही आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होता? यावर ते पुढे सांगतात, “भाजपविरोधात आमची एकजूट आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण यातून फार काही साध्य झाल्याचं दिसत नाही,” असं प्रधान सांगतात.

राजकीय विश्लेषक म्हणतात, उत्तर प्रदेशमध्ये या घटनेनंतर बंद झाला नाही. महाराष्ट्रात बंद करण्यात आला. गावागावातही बंदला प्रतिसाद मिळाला नाही.

मुंबईत काय चित्र होतं?

मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला. मुंबईत व्यापाऱ्यांनी आणि हॉटेल मालकांनी बंदला समर्थन दिलं होतं. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन सुरू होती. पण बेस्ट सेवा बंद असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. आठ ठिकाणी बसची तोडफोड करण्यात आली.

रस्त्यावर रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांची वर्दळ सुरळीत सुरू होती. संध्याकाळनंतर बस सेवा पूर्ववत झाली. मुंबईत सत्ता असलेली शिवसेनाही या बंदत सहभागी होती. शिवसेना कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी रास्तो रोको केलं. आक्रमक सेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळल्याचे तर, ठाण्यात रिक्षा चालकांना मारहाण आणि जबरदस्तीने दुकानं बंद करण्याचे प्रकारही घडले.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा दौरा ठरला: अयोध्येसह हे ही नियोजन- नांदगावकर

पुण्यात व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

पुण्यात बंदला संमिश्र प्रतिसाद होता. कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मार्केटयार्डमध्ये भाजीपाल्याची आवक-जावक झाली नाही. व्यापारी असोसिएशनने बंदला पाठींबा दिला असला. तरी, व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस दुकाने बंद होती. त्यामुळे दुकाने बंद ठेवण्यास सांगणं योग्य नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते.

पुणे जिल्हा रिटेल असोसिएशनने मात्र बंदमध्ये सहभागी न होता काळ्या फिती दंडाला बांधून लखीमपूरच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. शहरातील किराणा मालाची दुकाने, दूध केंद्रे, किरकोळ भाजी विक्रेते यांची दुकाने सुरू होती. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएमएल बंद ठेवण्यात आली होती.

नाशिकमध्ये मुख्य बाजारपेठ आणि ग्रामीण भाग वगळता इतर ठिकाणी व्यवहार सुरू होते. महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “काही व्यापारी भाजपला मानणारे आहेत. त्यामुळे त्यांचा बंदला विरोध असणारच.”

कोल्हापूरात काय झालं?

कोल्हापूरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी मोठी दुकानं बंद ठेवत या बंदला समर्थन दिलं. किरकोळ दुकानं तसंच छोटे व्यापार मात्र सुरू असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे बंगळुरू महामार्गावर रस्ता रोको करत वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती. मात्र पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ही वाहतूक सुरू झाली. कागलमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने हा मोर्चा काढता आला नाही.