पुणे – घर आणि दुकानांच्या खरेदीखताच्या नोंदणीत गतवर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत यंदा ४ हजार ७३९ कोटींची वाढ झाली आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाकडे सहा महिन्यांत १० लाख ४४ हजार दस्तांची नोंदणी झाली असून त्यातून ११ हजार ३४४ कोटींचा महसूल मिळाला आहे. यावरून बांधकाम क्षेत्र पूर्ववत होऊ लागले असल्याचे हे संकेत असल्याचे बोलले जात आहे.

जमिनी, सदनिकांची खरेदी-विक्री, करार, बक्षीसपत्र, शेअरबाजार अशा विविध प्रकाराच्या नोंदणीतून नोंदणी विभागाकडे कर जमा होतो. शहरांच्या हद्दीलगतच्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर नागरिकरण होत आहे. यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहारातही मोठी वाढ होत आहे. हे नोंदणी विभागाला मिळालेल्या महसुलावरून समोर आले आहे.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात कठोर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात दस्त नोंदणीची संख्या आणि महसुलात सुद्धा घट झाली होती. त्यानंतर मात्र जून ते सप्टेंबर या महिन्यात परिस्थितीत फरक पडल्याचे दिसून आले असून दस्त नोंदणीच्या संख्येत आणि महसुलात सुद्धा वाढ झाली आहे. पितृपंधरवड्यात दस्तनोंदणीचा वेग कायम होता. तसेच सप्टेंबर महिन्यातही महसुलाचा अडीच हजार कोटींचा टप्पा पार पडला आहे.

एप्रिल ते सप्टेंबर २०२० या कालावधीत ७ लाख ९३ हजार १३० दस्त नोंदणीतून ६ हजार ६०५ कोटींचा महसूल मिळाला आहे. तर यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १० लाख ४४ हजार ३०१ दस्त नोंदणीतून ११ हजार ३४४ कोटींचा महसूल मिळाला आहे.