मुंबई – उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी आज राज्यात बंद पुकारला आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बंदवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आजचा बंद म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंदमुळे मविआ सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे. कारण लखीमपूरच्या घटनेकरिता महाराष्ट्रामध्ये बंद केला जातो. मात्र महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. हे सरकार आल्यापासून राज्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बांधावर जाऊन मदतीची आश्वासने दिली. मात्र ही आश्वासने हवेत विरली.

आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. कारण याच मंडळींनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता, अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना अशा प्रकारचं आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का. खरंतर लखीमपूरची घटना गंभीर आहे. तेथील सरकार त्यावर कारवाई करत आहे. हा बंद हा त्या घटनेबाबत सहानुभूती व्यक्त करण्यासाठी नाही आहे तर त्यावर राजकीय पोळी भाजता येईल का या संकुचित विचाराने केलेला बंद आहे. म्हणूनच लोकांचा या बंदला प्रतिसाद नाही आहे. मात्र प्रशासनाची मदत घेऊन, दमदाटी करून, धमक्या देऊन राज्यातील लोकांना बंद पाळण्यासाठी भाग पाडलं जात आहे. तसंही हे बंद सरकार बंद सरकार आहे. योजना, अनुदानं बंद केली, कोरोना काळात देश सुरू असताना महाराष्ट्र बंद केला होता. आता काही सुरू होत असताना सरकारने बंद पुकारला, असा टोला फडणीवस यांनी लगावला.

अधिक वाचा  'स्वच्छ'ला काम मिळताच साहित्य खरेदीही सुरू

खरंतर उच्च न्यायालयाने एका निर्णयानुसार बंद पुकारणे बेकायदेशीर ठरवलेले आहे. त्यामुळे न्यायालयाने या बंदची दखल घ्यावी. तसेच बंदमधील नुकसानीची भरपाई सरकारकडून वसूल करण्यात यावी. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बंदचा निर्णय घेतला, ही घटनेची पायमल्ली आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

शेतकरी भाजपपासून दूर होईल हे विरोधकांचे दिवास्वप्न

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली असून, राज्यभरात बंदला प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला असून, लखीमपूर घटनेला जालियनवाला बाग म्हणताना मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवले नाही का, अशी विचारणा करत शेतकऱ्यांना भाजपपासून दूर करतील असे त्यांचे दिवास्वप्न आहे, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

अधिक वाचा  किरण गायकवाड ‘देवमाणूस २’मध्ये दिसणार कि नाही?

कुणीतरी गाडीखाली चिरडले म्हणून इतरांना चिरडण्याचा अधिकार कुणाला मिळालेला नाही. ते जेवढे निंदनीय असेल तर त्याला समोर ठेवून असे काम होईल तर ते देखील तेवढेच निंदनीय आहे, अशी टीका करत अशा प्रकारचा बंद कसा काय पुकारला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे बंद केले जाऊ नयेत, असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाला आवाहन करेन की, याबाबत सुओ मोटो दाखल करून घ्यावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

तेव्हा जालियनवाला बाग आठवल नाही का?

यावेळी लखीमपूर खेरीच्या घटनेची तुलना जालियनवाला बागशी केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवले नाही का? राजस्थानमध्ये चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांना तुडवले गेले, काँग्रेस सरकारने बेछूट मारले, त्यावर का बोलत नाही? हे राजकीय वक्तव्य करत आहेत, पोळी भाजत आहेत, लखीमपूर घटनेमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण भाजपपासून दूर करतील असे त्यांचे दिवास्वप्न आहे. पण शेतकऱ्यांवर खरा अन्याय यांनीच केलाय. मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना आणली, त्यांनी का नाही आणली? शेतकरी यांच्यासोबत कधीही जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  शेतमालाची ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत १२४५ ठिकाणी विक्रीव्यवस्था

नैतिकता असेल तर शेतकऱ्यांचे पॅकेज घोषित करतील

या सरकारला थोडी जरी नैतिकता असेल तरी महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एखादे पॅकेज घोषित करतील अन्यथा यांचा ढोंगीपण अजून उघड होईल. महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. हे सरकार आल्यापासून २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन २५ हजार आणि ५० हजाराच्या केलेल्या घोषणा हवेत विरल्या, कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरल्या, मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, वेगवेगळी संकटे आली, त्यावेळी केलेल्या मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.