अर्धापूर : अतिवृष्टी, महापुरामुळे आमच्या गावांचा संपर्क तुटने ही नित्याचीच बाब झाली आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री येणार, पाहणी करणार, आश्वासन देवून परत जाणार हे आमच्या नेहमीच्या पावसाळ्या प्रमाणे झाले आहे. रोजचं मरे त्यासाठी कोण रडे अशी आमची अवस्था झाली असून आमचे जगणे अवघड झाले आहे. खरिपाच्या पिकांचे पार वाट्टोळे झाले आहे. खळे करण्यासाठी पिकच शिल्लक राहिले नाही. आम्हाला सरसकट मदत व पर्यायी रस्ता हवाय अशा भावना शेवगाव खुर्द व बुद्रुक येथील शेतकरी, नागरिकांनी मांडून आपल्या आठवणींना उजळा दिला.

अर्धापूर तालुक्यात यंदाच्या सततच्या अतीवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच गावातील खरिपाच्या पिकांना खूप फटाका बसला असून शेतकरी हावालदिल झाला. खरिपाचे पिकं पाण्याखाली गेली. केळीच्या बागा आतिपावसामुळे पिकून गेल्या. शेती खरडून गेली. कापसाची बोंडे सडून गेली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हीरावून‌ नेल्याने रब्बीच्या पेरण्या कशा कराव्यात, सन वार, शैक्षणिक, आरोग्याच्या गरजा कशा प्रकारे पूर्ण कराव्यात असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहे आहेत. यंदाच्या महापूर व अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटल्याने विद्यार्थ्यांना परिक्षेला मुकावे लागले आहे. या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

अधिक वाचा  पुणे ZP नवीन प्रारूप- रचना निश्चित; फेररचनेत आमदारांची लुडबूड

“यंदाच्या हंगामात दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे. आमचा हात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हीरावून‌ नेल्याने आमच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आर्थिक बजेट कोलमडले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विशेष पॅकेज देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा.”.                – शेतकरी.

“आमच्या गावांना नेहमीच पुराचा वेढा पडल्याने गावांचा संपर्क तुटत असतो. त्यामुळे आजारी वृध्द, गर्भवत महिलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. विद्यार्थी परिक्षेला मुकतात. आमच्या गावांना पर्यायी रस्ता बांधण्याची गरज आहे. शेलगाव खुरगाव व शेवगाव – वाहेदपूर -कामठा हे दोन रस्ते आहेत. कामाला मंजुरी आहे पण निधी नसल्याने काम झाले नाही.” – शेतकरी.