वालचंदनगर : श्री छत्रपती कारखान्यातील काही संचालकांची दुकानदारी बंद पडल्यामुळे मला संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बसण्यास विरोध केला जात आहे, असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला.

जाचक यांना शुक्रवारी (ता. ८) कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीतून बाहेर जाण्यास काही संचालकांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संचालक मंडळावर आरोप केले. त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने मी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहत आहे. तसेच, मला कारखान्याने लेखी पत्र दिले होते. आज बैठकीमध्ये काही संचालकांनी मला बसण्यास विरोध केला.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

अजितदादांनी मला ‘बैठकीला बसू नका’ असे सांगितल्यानंतर मी बैठकीला बसणार नाही. कारखान्याचे अध्यक्षांनी मला बैठकीतून बाहेर जाण्याचे पत्र द्यावे. संचालक मंडळ सन २०२१-२२ गाळप हंगामातील रॉ-शुगर व मॉलेसेसची विक्री करण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे सभासदांचा तोटा होणार आहे. ऊस पुरवठा न करणाऱ्या सभासदांना निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क देऊ नये व त्यांना वर्षाला ७५ किलो साखर वाटप करू नये. सभासदांच्या हितासाठी मी बैठकीला जात आहे.

जाचक यांच्या तक्रारीमुळे संचालकांकडून विरोध : काटे

‘‘श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना दीड वर्षापूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलाखतीच्या बैठकीला उपस्थिती राहण्याचे पत्र कारखान्याने दिले होते. सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने ते दीड वर्ष बैठकीला उपस्थित होते. त्याला विरोध संचालक मंडळाचा विरोध नव्हता. मात्र, त्यांनी न्यायालयाच्या तारखेला उपस्थित राहत असल्याच्या व खर्चाच्या कारणावरून काही संचालकांच्या विरोधात तक्रारी अर्ज दिला. त्यामुळे १६ संचालकांनी शुक्रवारी (ता. ८) त्यांना बैठकीमध्ये बसण्यास विरोध केल्याचे पत्र दिले,’’ अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.

अधिक वाचा  कर्वेनगरला विद्युत रोषणाई उदघाटन सोहळा संपन्न

त्‍यांनी सांगितले की, श्री छत्रपती कारखाना आर्थिक अडचणींमधून जात आहे. सन २०२१-२२चा गळीत हंगाम सुरु करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कारखान्याला ४० ते ४५ कोटी रुपयांची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठी रक्कम उभारणे अवघड असल्याने आगाऊ रॉ-शुगर व मॉलेसेस विक्रीचा निर्णय घेतला. त्यामुळे कारखान्याला एका पोत्यामागे सुमारे ५०० रुपये अॅडव्हान्स मिळणार आहे. तसेच, कारखान्याचे व्याजही वाचणार आहे. त्यातून कारखान्याचा व सभासदांचा फायदा होणार आहे. कारखान्याचे २९ हजारापेक्षा जास्त सभासद असून नियमानुसार सर्वांना साखर वाटप केली जात आहे.