पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या कपन्यांवर आयकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरुच आहे. या सर्व प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ते मिश्किलपणे पाहुणे असे म्हणाले. तसेच ही चौकशी संपली की पूर्ण पुराव्यानिशी बोलतो, असेदेखील अजित पवार म्हणाले.

कोणत्याही कंपनीवर रेड टाकण्याचा आयकरला अधिकार

अजित पवार आज कोरोनाविषयक आढावा बैठकीसाठी पुणे दौऱ्यावर होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांची आयकर विभागमार्फत सुरु असलेल्या चौकशीवर भाष्य केले. “आता सध्या चौकशी सुरु आहे. आयकर विभाग त्यांचं काम करणार आहे. सध्या काम सुरु आहे. हे काम जेव्हा संपेल तेव्हा मी या संदर्भात बोलेन. आजसुद्धा हे काम सुरु आहे. आयकर विभागाला कोणत्याही कंपनीवर रेड टाकण्याचा अधिकार आहे. यामध्ये काय योग्य आहे ? काय अयोग्य आहे ? कॅश सापडतात का ? याची ते चौकशी करतात. त्यांची चौकशी करुन ते जातील. मग मी यावर भाष्य करेल,” असे अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? फडणवीसांचे पहिल्यांदाच सविस्तर उत्तर

सर्वांनी कर भरला पाहिजे

तसेच मी कधीही कर चुकवेगिरी करत नाही असे अजित पवार यांनी निक्षून सांगितले. कर कसा चुकवता येणार नाही, यासाठी मी अधिकाऱ्यांशी बोलत असतो. माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांसहित सर्व कंपन्यांनी कर भरला पाहिजे या मताचा मी आहे. आर्थिक शिस्त कोणी मोडू नये, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

पाहुणचार झाल्यानंतर मी बोलेन

तसेच पुढे बोलताना अजित पवार आयकर विभाग तसेच अधिकाऱ्यांना मिश्किलपणे पाहुणे असे म्हणाले. पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना “पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर मी सगळं बोलेन. मी इथेच आहे. मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. मी कुठेही जाणार नाही,” असे अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  इराणमधील सफरचंदे बाजारात दाखल; सुकामेव्याची आवकही सुरळीत

पार्थ पवार, अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर कारवाई

दरम्यान, आज अजित पवार यांच्यासह त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. जवळपास 30 तासांपेक्षा जास्त काळापासून हे धाडसत्र सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे आयकर विभागाचे कर्मचारी सर्व तयारीने आले असून, हे धाडसत्र आणखी काही काळ चालणार असल्याची माहिती मिळत आहे.

सात ते आठ अधिकाऱ्यांनी कालची रात्र पार्थ पवार यांच्या ऑफिसमध्येच घालवली. त्यानंतर आज सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, तसेच नातेवाईकांच्या मुंबई, गोवा, सातारा, पुणे, बारामती इथल्या कंपन्यांवर आजही आयकर विभागाकडून छापेमारीची शक्यता आहे.