मुंबई : महाराष्ट्रात सनदी अधिकाऱ्यांना आवडीचे पाेस्टिंग तसेच विविध कामांना सरकारी मंजुरी देण्यासाठी मध्यस्थांचे एक माेठे रॅकेट प्राप्तीकर खात्याने उघड केले आहे. या रॅकेटच्या माध्यमातून सुमारे १ हजार काेटी रुपयांपेक्षा अधिक संशयास्पद व्यवहार प्राप्तिकर खात्याने पकडले आहेत. अधिकाऱ्यांनी एकेका पाेस्टिंगसाठी थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल २०० काेटी रुपये माेजले आहेत.

प्राप्तिकर खात्याने महाराष्ट्रातील काही व्यावसायिक, मध्यस्थ तसेच सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाराच्या पदांवर बसलेल्या काही जणांवर २३ सप्टेंबरला छापे मारले हाेते. त्यात २५ निवासी आणि १५ कार्यालयांवर कारवाई करण्यात आली हाेती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे व्यक्ती आणि त्यांच्यामार्फत हाेणाऱ्या व्यवहारांवर प्राप्तिकर खात्याने सुमारे ६ महिने पाळत ठेवल्यानंतर छापे मारण्यात आले हाेते.

अधिक वाचा  दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 'त्या' प्रवाशाला  पुण्यात होम क्वारंटाईन

संबंधितांकडील इन्क्रिप्टेड पद्धतीने सुरक्षित संवाद प्राप्तिकर खात्याने माेठ्या जिकरीने फाेडला असून डिजिटल स्वरूपातील पुरावेही गाेळा करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईत ४.६ काेटी रुपये राेख आणि जवळपास ३.४२ काेटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले हाेते. एकूण १०५० काेटी रुपयांचा हा घाेटाळा असल्याचे प्राप्तिकर खात्याने सांगितले.

या रॅकेटमध्ये गुंतलेल्या दाेन मध्यस्थांनी मुंबईतील ओबेराॅय हाॅटेलमध्ये काही सुट्स कायमस्वरूपी भाड्यावर घेतले आहेत. त्यांचा वापर वाटाघाटीच्या बैठकांसाठी करण्यात येत हाेता. सनदी अधिकाऱ्यांनी आवडीच्या तसेच काही ठराविक मंत्रालयामध्ये पाेस्टिंग मिळविण्यासाठी माेठ्या प्रमाणावर पैसा दिला. तसेच कंत्राटदारांनीही अडकलेले पैसा मिळण्यासाठी दिलेली लाच आणि दलालीही या कारवाईतून पकडण्यात आली आहे. हा पैसा ठराविक लाेकांना देण्यात येत हाेता. ठराविक पाेस्टिंगसाठी ठरावित चार्ज आकारण्यात येत हाेता. त्यांच्या नावांचा काेडनेमद्वारे उल्लेख करण्यात येत असे. एका प्रकरणात १० वर्षांपूर्वीचीही नाेंद आढळली आहे. आवडत्या पाेस्टिंगसाठी २०० काेटी रुपयांपर्यंत पैसे माेजले आहेत.

अधिक वाचा  तुमच्या खिशावर होणार उद्यापासून हे परिणाम, नवे बदल वाचा सविस्तर

याच कारवाई आणखी एक माेठे रॅकेट उघडकीस आले आहे. एका व्यावसायिक मध्यस्थाने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून त्यात सरकारी विभाग आणि बड्या कार्पाेरेट्सला विकून अमाप संपत्ती गाेळा केली आहे. या जमिनी विविध सरकारी याेजना, खाणी इत्यादींसाठी देण्यात येत हाेत्या. या याेजनेचा अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी तसेच त्यांचे नातेवाईक व इतर बड्या लाेकांनी ‘लाभ’ घेतला आहे. तारखेनिहाय व्यवहाराच्या नाेंदी मध्यस्थाकडे आढळल्या आाहेत. त्यानुसार २७ काेटी रुपये राेख जमा तसेच ४० काेटी रुपयांचे पेमेंट केल्याच्या नाेंदी आहेत.

डिजिटल डाटा हस्तगत

एका व्हाॅट्सॲप चॅटमध्ये २८ काेटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख आढळला आहे. डिजिटल डाटा विविध पेन ड्राईव्ह, स्मार्टफाेन्स, ई-मेल, आयक्लाउड इत्यादींमधून हस्तगत करण्यात आला आहे. त्यातून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे