इशान किशनने 25 चेंडूत झळकवलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 70 चेंडू आणि 8 विकेट राखून राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला. मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयामुळे मुंबई इंडियन्सला आवश्यक असणाऱ्या नेट रनरेटमध्येही सुधारणा झालीये. माफक धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशनने डावाला सुरुवात केली. रोहित शर्मा 13 चेंडूत 22 धावा करुन बाद झाला. चेतन सकारियाने त्याला बाद केले. सुर्यकुमार यादव 8 चेंडूत 13 धावा करुन परतला. ईशान किशनने 25 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या.

नॅथन कुल्टर नीलने घेतलेल्या 4 विकेट आणि त्याला नीशम-बुमराह यांनी दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने राजस्थानला अवघ्या 90 धावांवर रोखले होते. राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 9 बाद 90 धावा केल्या. एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने राजस्थानच्या डावाला आक्रमक सुरुवात केली. पण यशस्वी जयस्वालच्या रुपात नॅथन कुल्टर नीलने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. जयस्वालने 9 चेंडूत 12 धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ धावफलकावर 41 धावा असताना बुमराहने लुईसला बाद केले. त्याने राजस्थानकडून सर्वाधिक 19 चेंडूत 24 धावांची खेळी केली. त्यानंतर अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही.

अधिक वाचा  पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण; निर्बंध लादणार का? आयुक्त म्हणाले…

प्ले ऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स शारजाच्या मैदानात उतरले होते. मुंबई इंडियन्सने या सामन्यातील विजयासह स्पर्धेतील आपल्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. आता ज्या राजस्थानला हरवले त्यांनी कोलकाताला हरवण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. याशिवाय सनरायझर्स विरुद्धचा सामनाही जिंकावा लागणार आहे. मुंबई इंडियन्सकडून नॅथन कुल्टर नीलने 4, नीशमने 3 तर बुमराहने दोन विकेट घेतल्या.