देगलूर : तिघे नव्हे तर पाच जणही एकत्र येऊन आमच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही पुरून उरू, असा स्पष्ट इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. तिघाडीचे हे सरकार लवकरच, पण मुहूर्त सांगणार नाही, त्यांच्या कर्माने ते लवकरच कोसळेल, असे भाकीत त्यांनी केले. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष पिराजी साबणे यांना भाजपने विधानसभेच्या देगलूर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी कालच जाहीर केली आहे.

येथे सोमवारी (ता. ४) झालेल्या मेळाव्यात साबणे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पाटील बोलत होते. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सुनील कर्जतकर, भाऊसाहेब देशमुख, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, गणेश हाके, गंगाराम ठक्करवाड, राजेश महाराज देगलूरकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रवीण साले, गंगाधर जोशी आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  शेतमालाची ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत १२४५ ठिकाणी विक्रीव्यवस्था

सरकार तुमचे, तुम्ही सरकारचे प्रमुख असूनही प्रत्येक जिल्ह्यात तुमच्या कार्यकर्त्यांची कोंडी होत असेल, तुम्ही गप्प राहणार असाल तर हळूहळू एक एक कार्यकर्ता दूर होणार नाही तर काय? सत्तेसाठी लाचारी तरी किती पत्करायची, हे ठरवण्याची वेळ आली असल्याचा टोला प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला. दीर्घकाळ पक्षात राहूनही न्याय न मिळाल्याने साबणे भाजपमध्ये आले आहेत. आमच्याकडे त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी आचारसंहितेची अट किंवा आडकाठी ठरणार नाही, हे सरकारला कोणीतरी सांगण्याची गरज असली तरी त्यांना द्यायचेय कुठे? आमचे सरकारने नुकसान भरपाईपोटी साडेसहा हजार कोटींचे वाटप केले, अशी आठवणही पाटील यांनी करून दिली.

खोत यांचे टीकास्त्र

विद्यमान सरकार अलिबाबाच्या टोळीसारखे असून कमी वेळात जास्त खाण्याची ते घाई करत आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. त्यांना मिळणारा परतावा कमीच आहे. मग बाकीचे पैसे गेले कुठे? या सरकारला खाली खेचल्याशिवाय शेतकऱ्यांचा उद्धार होणार नाही, असे खोत म्हणाले.

अधिक वाचा  ४ डिसेंबरला का साजरा केला जातो? भारतीय नौदल दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्व

जिल्ह्यात होती सरंजामशाही

जिल्ह्यात यापूर्वी मोठ्या प्रमाणात सरंजामशाही होती. आता हळूहळू अनेकांना त्यांचे सर्व कारनामे कळत असल्याने अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यापुढे भाजपच्या कार्यकर्त्यांकडे बोट दाखवण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांना होणार नाही. पक्षात येणाऱ्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही खासदार चिखलीकर यांनी दिली. लक्ष्मण ठक्करवाड, शिवाजीराव कनंकटे, प्रा. उत्तमकुमार कांबळे, बबन पाटील, अशोक गंदपवार, प्रशांत दासरवार, अनिल पाटील, विक्रम साबणे, अवधूत महाराज, सचिन पाटील, अशोक कांबळे आदी उपस्थिती होते. जिल्हाध्यक्ष गोजेगावकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. माधव उचेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश पाटील ठाणेकर यांनी आभार मानले.

अधिक वाचा  इराणमधील सफरचंदे बाजारात दाखल; सुकामेव्याची आवकही सुरळीत

मतदार पुन्हा संधी देतील – साबणे

माझे जुने हक्काचे घर सोडताना अतीव दुःख होत असल्याचे सांगताना माजी आमदार साबणे यांनी गहिवरून आले. कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय, मुस्कटदाबीमुळे मला पक्षांतराचा निर्णय घेऊन पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. मतदार मला पुन्हा सेवेची संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खतगावकरांची मेळाव्याकडे पाठ

साबणे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्याकडे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, देगलूर- बिलोली मतदारसंघाचे दीर्घकाळ नेतृत्व करणारे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पाठ फिरवल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. मतदारसंघावर पकड असलेला एक मोठा गट पोटनिवडणुकीच्या या कार्यक्रमात अलिप्त राहिला तर भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोणता मार्ग काढतात, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.