लखनौ : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीसिंग चन्नी यांना उत्तर प्रदेशमध्ये येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तसे आदेश उत्तर प्रदेश सरकारने काढले आहेत. पहिल्यांदा पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी लखीमपूरला जाण्यास निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आता दोन मुख्यमंत्र्यांची विमाने उत्तर प्रदेशमध्ये उतरण्यास योगी सरकारने परवानगी नाकारली आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नेमकं चाललंय काय?, असा सवाल उपस्थित होत आहे.

उत्तर प्रदेश सरकारने मला राज्यात पाऊल न ठेवण्याचा आदेश काढलाय. उत्तर प्रदेश सरकार नागरिकांच्या अधिकारांवर बंधनं का आणत आहे?, जर लखीमपूरला कलम 144 लागू आहे तर मग लखनौला विमान उतरण्यास परवानगी का नाकारण्यात आली आहे. हे सरकार हुकुमशाही पद्धतीने वागत आहे, योगी सरकारचा निषेध, अशा संतप्त भावना मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी व्यक्त केल्या आहेत.

अधिक वाचा  शेतमालाची ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत १२४५ ठिकाणी विक्रीव्यवस्था

उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधींना ताब्यात घेतलं

लखीमपूरच्या शेतकऱ्यांना भेटायला निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरा प्रियांका लखौनाला पोहोचल्या. तिथून त्या लखीमपूरला पडत्या पावसात रवाना झाल्या. दरम्यान, साडे आज पहाटे (सोमवारी ) 5.30 च्या सुमारास उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधींना हरगाव पोलीस स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे.

प्रियांका गांधी नजरकैदेत

प्रियांका गांधींना सीतापूर जिल्ह्यातील एका गेस्ट हाऊसमध्ये नेण्यात आले आहे. यूपी काँग्रेसने ट्विट करुन लोकांना समर्थनासाठी या भागात पोहोचण्यास सांगितले आहे. प्रियांका गांधींना ताब्यात घेऊन पोलीस त्यांना सीतापूर जिल्ह्यातल्या सिंधोली येथे घेऊन गेले आहेत, तिथे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहेत.

अधिक वाचा  सातारा जिल्हा बँक निवडणूक: नितीन पाटील यांची वर्णी कशी?; शिवेंद्रराजे मागे का पडले?

काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट

याअगोदर लखनौवरुन लखीमपूरला जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळाली. पोलिसांनी प्रियांका गांधींना रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्या लखीमपूरला जाण्यावर ठाम होत्या. त्यांना पोलिसांना गुंगारा देऊन काही अंतर पायी चालल्या आणि नंतर गाडीत बसून लखीपूरच्या दिशेने रवाना झाल्या.

नेमकी घटना काय?

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्या काही तरी बाचाबाची झाली आणि मग गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप केला गेलाय.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा दौरा ठरला: अयोध्येसह हे ही नियोजन- नांदगावकर

केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचं मूळ गाव बनवीरपूर गावात ही घटना घडली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जमलेल्या शेतकरी आंदोलकांवर दोन मोटारी घुसवल्यानंतर हिंसाचार घडला. आंदोलकांनी या दोन मोटारींना आग लावल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

या घटनेत चार शेतकरी आणि इतर चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी एका मोटारीत आशिष मिश्रा हा मंत्रीपुत्र होता, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र मंत्रीमहोदयांनी हा आरोप फेटाळला आहे. या घटनेत भाजपच्या तीन कार्यकर्त्यांचा आणि एका वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे, असं मिश्रा यांनी सांगितलं.