पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता अवघे चार महिने शिल्लक राहिल्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची शहरात मात्र महापालिका निवडणुकीसाठी आघाडी होण्याची शक्‍यता दुरावली आहे. जागा वाटपामध्ये मतभिन्नता होण्याच्या शक्‍यतेने तीनही पक्षांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका स्वीकारत निवडणुकीची तयारी चालविल्याचे पहावयास मिळत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर स्थापनेपासून कॉंग्रेसची, तर त्यानंतर सन 2017 पर्यंत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मोदी लाट आणि प्रस्थापित नेतेमंडळींनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला 2017 मध्ये नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता. या पराभवातूनही राष्ट्रवादीने काहीही शहाणपण घेतले नसल्याचेच वारंवार समोर आले होते. मात्र राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाचे सरकार आल्यानंतर शहर पातळीवरील राष्ट्रवादीसह शिवसेनेमध्ये काही प्रमाणात का होईना ऊर्जा निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  कर्नाटकात ओमिक्रॉन : 2 आठवडे भारताला महत्त्वाचे- आरोग्य तज्ज्ञ

सध्या करोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव, तीन सदस्यीय वॉर्ड पद्धतीचा शासनाने घेतलेला निर्णय आणि निश्‍चित वेळेत महापालिका निवडणूक होण्याच्या शक्‍यतेने राजकीय वातावरण पुन्हा ढवळू लागले आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा महाविकास आघाडीतील नेत्यांनी केल्या होत्या. मात्र निवडणुका जवळ येऊ लागल्या तसा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याच्या सूचना दिल्यामुळे आघाडीची आशा मावळू लागली आहे.

पिंपरी-चिंचवडचा विचार केल्यास अजित पवारांचे वर्चस्व, राष्ट्रवादीने केलेली विकासकामे, सध्या भाजपाला सुरू झालेली गळती आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेले ‘इनकमिंग’ या बाबींमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढू लागली आहे. अधिकाधिक जागांवर पक्षाचे उमेदवार दिल्यास महापलिकेची सत्ता प्राप्त होऊ शकते, अशी आशा स्थानिक नेत्यांमध्ये निर्माण झाल्याने राष्ट्रवादीकडून स्वबळाची भाषा सुरू झाली आहे. त्यातच शिवसेनेच्या नेत्यांनीही स्वबळाचा नारा दिल्यामुळे हे दोन्ही पक्ष निवडणूकपूर्व युतीपेक्षा निवडणुकीनंतरच्या युतीवर भर देण्याची शक्‍यता आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसमध्ये मात्र अद्यापही शांतताच आहे.

अधिक वाचा  DCGI कडे सिरमचा अर्ज प्रलंबित ; अनेक देशात 'बूस्टर डोस'ला सुरुवात

जागावाटपाचा फॉर्म्युला अवघड

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. त्यानंतर शिवसेनेची व काही प्रमाणात कॉंग्रेसला मानणारा मतदार आहे. गत 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी राष्ट्रवादीने केली होती. मात्र त्यामध्ये कॉंग्रेसच्या नेत्यांनी जागावाटपांवरून घेतलेल्या भूमिकेमुळे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकले नव्हते. गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे 36, तर शिवसेनेचे 9 नगरसेवक निवडून आले होते. कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे यावेळी कॉंग्रेसची भूमिका काय असणार आणि शिवसेना किती जागा मागणार यावरच हे प्रश्‍न अनुत्तरीत असल्यामुळे तीनही पक्षांची स्वतंत्र लढण्याचीच भूमिका असल्याचे पहावयास मिळत आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीचे खासदार कोल्हेंची कोल्हेकुई? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची असण्याचं?; आनंद दवे यांचा सवाल

बदनाम तरी ताकदवान

भाजपाकडे स्थानिक पातळीवर दोन तगडे नेते असल्यामुळे तसेच गेल्या काही वर्षांत भाजपाच्या स्थानिक नेत्यांची आर्थिक ताकदही वाढल्यामुळे विरोधकांपुढे भाजपाला हरविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्या साडेतीन वर्षांत महापालिकेत झालेला अपहार, ओसरलेली मोदी लाट आणि महाविकास आघाडीकडे असलेली राज्यातील सत्तेची ताकद तसेच लाचखोरीसारखे प्रकरण यामुळे भारतीय जनता पक्ष बदनाम झाला असला तरी पक्षीय, आर्थिक आणि कार्यकर्त्यांची मोठी ताकद पक्षासोबत असल्यामुळे महापालिकेची निवडणूक तुल्यबळ होईल, यात मात्र शंका नाही.