जळकोट : सरकारने कुठलीही चालढकल न करता अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी लावून धरणार आहे. शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत सरकारला झोप लागू देणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर कालपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. रविवारी (ता. ३) त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगाव व बिलोली तालुक्याताल काही गावांतील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यानंतर लातूर जिल्ह्यात ते गेले. वांजरवाडा (ता. जळकोट) येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते.

अधिक वाचा  देशाचा गरिबी अहवाल : बिहारमध्ये सर्वाधिक ५१ टक्के, तर सर्वात कमी कुठे? महाराष्ट्रही २ अंकी?

खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार संभाजी पाटील- निलंगेकर, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी खासदार सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

आम्ही सत्तेत असताना

दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला सातशे ते आठशे कोटी रुपयांची मदत मिळत होती. तरीही हे लोक मोर्चे काढत होते. मात्र, आता ते स्वतः सत्तेत असताना शेतकऱ्यांकडे पाहत नाहीत. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. विमा कंपनीचे प्रतिनिधी सर्वेक्षण करायला येण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाचशे रुपये मागतात. विमा कंपन्यांनी सरसकट विमा द्यावा, असे फडणवीस म्हणाले.