सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते आज अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मुंडे यांनी कोरोनाकाळातील आठवणी सांगितल्या. त्यांनी भावनिक होत मला कोरोना झाला तेव्हा माझ्यासोबत कुणीच आलं नाही. मी माणुसकी मेलेली पाहिली, असे उद्गार काढले. तसेच परनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाचे तोंडभरुन कौतूक केले.

मी माणुसकी मेलेली पाहिली

‘लंके यांच्यात अद्भुत शक्ती आहे. कोरोनाकाळात तुम्ही माणुसकी दाखवली. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आली. यामध्ये मला कोरोना संसर्ग झाला. मला कोरोनाची लागण झाल्याचे रात्री बारा वाजता समजले. कोविडच्या संकटात मी माणुसकी मेलेली पहिली आहे. कोरोना होण्याआधी मी फिरत होतो, तेव्हा 50 लोक माझ्यासोबत असायची. मात्र कोरोना झाला तेव्हा मी एकटाच रुग्णवाहिकेमध्ये बसलो होतो. माझ्यासोबत कोणीच नव्हते, अशी वेदना धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.

अधिक वाचा  CNG चे दर २ महिन्यांत ३री वाढ; १४ रुपयांनी वर्षभरात वाढले दर !

निलेश लंके यांनी माणुसकी दाखवली, जास्त निधी देणार

तसेच पुढे बोलताना मुंडे यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर उभारल्यामुळे निलेश लंके यांचे कौतुक केले. निलेश लंके यांनी माणुसकी दाखवली आहे. इतरांपेक्षा जास्त निधी मी या मतदारसंघात देणार आहे. तुमच्या मतदारसंघात पाणी वाहण्याचा शब्द मी देत आहे, असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी निलेश लंके यांना दिले.

राष्ट्रवादीच्या नेते आमदार निलेश लंके यांच्या घरी

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आमदार निलेश लंके यांच्या घरी शरद पवारांनी भेट दिली. आमदार निलेश लंके यांचं घर अत्यंत साधं आहे. एक रुम, त्यातच छोटं किचन आणि बाजूला बाथरुम अशी निलेश लंके यांच्या घराची रचना आहे.

अधिक वाचा  Omicron Variant चा कहर, राज्यात 13 देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध - आरोग्यमंत्री

आमदार लंके यांच्या या छोट्या घरात देशातील बडा नेता असलेले शरद पवार यांनी भेट दिल्यामुळे लंके कुटुंबीय भारावून गेलं. आमदार लंके यांच्या छोटेखानी घरात राष्ट्रवादीचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवारांसोबत नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार हे सुद्धा निलेश लंके यांच्या घरी दाखल झाले होते. राज्यातील भारदस्त नेते छोट्या घरात आल्यानंतर, लंके कुटुंबाची एकच धावपळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.