नाशिक : उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली आहे. आतिफ उर्फ कुणाल नावाच्या व्यक्तीला नाशिक रोडच्या आनंद नगर भागातून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

आतिफ हा कुणाल या नावाने नाशिक शहरात वास्तव्याला होता. परदेशातील वेगवेगळ्या खात्यांमधून तब्बल 20 कोटी रुपये आतिफ उर्फ कुणालच्या खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पैसे कुठून आले, याचा तपशील उपलब्ध नाही. दहशतवाद विरोधी पथक या बाबत अधिक तपास करत आहे. उत्तर प्रदेशच्या धर्मांतर प्रकरणात आतिफचा समावेश असल्याचा एटीएसला संशय आहे.

अधिक वाचा  पुणे शहरात १.९५ टक्के शुल्क तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करणार; स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता

बीडच्या तरुणावर धर्मांतर रॅकेटमध्ये सहभागाचा आरोप

दरम्यान, उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यातील इरफान शेख नावाच्या तरुणाला जून महिन्यात अटक झाली होती. मूकबधिर विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला होता. इरफान शेख हा तरुण मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातील परळीसारख्या दुर्गम तालुक्यातल्या शिरसाळा या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. या तरुणाचं शिक्षण सुद्धा शिरसाळा गावातल्या प्राथमिक शाळेत झालं. यानंतर नोकरीच्या निमित्ताने तो दिल्लीत गेला.

प्राध्यापक म्हणून काम करताना धर्मांतर

त्या ठिकाणी तो प्रोफेसर म्हणून काम करत होता. मात्र प्रोफेसर म्हणून काम करत असताना तो धर्मांतराच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप उत्तर प्रदेश पोलिसांनी केला होता. या प्रकरणात त्याला पोलिसांकडून अटकही झाली होती.

अधिक वाचा  मीच Congress ची पूर्णवेळ अध्यक्षा; CWC मध्ये जी-२३ नेत्यांना ठणकावले

उत्तर भारतातील कथित धर्मांतर प्रकरण गंभीर आहे. उत्तर प्रदेश मधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जवळपास 1 हजार लोकांना धर्मांतरित करण्यात आल्याचा आरोप होतोय. नागरिकांचं धर्मांतर करत असताना वेगळी थेअरी अवलंबण्यात आल्याचीही चर्चा रंगली होती.

इरफानच्या कुटुंबाने आरोप फेटाळले

इरफानला या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याच्यावर करण्यात आलेले आरोप त्याच्या कुटुंबाने फेटाळून लावले होते. इरफान असं असं करू शकत नाही असं त्याच्या कुटुंबाचा म्हणणं होतं.

योगी सरकारची कठोर पावलं

दरम्यान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात सुमारे एक हजार जणांचं जबरदस्ती धर्मांतर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती जून महिन्यातच उघड झाली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकार खडबडून जागे झाले. जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी योगी सरकारने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. जबरदस्ती धर्मांतर करणाऱ्यांना रासुका (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) अंतर्गत अटक करा आणि अशा लोकांची संपत्तीही जप्त करा, असे आदेश योगींनी दिले होते. विशेष म्हणजे धर्मांतराविरोधात यूपीत कठोर कायदा लागू असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे निर्देश दिले.