मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे मंत्री सुद्धा होते. आता काँग्रेस पक्षाने या बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे.

आज काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या बहुसदस्यीय रचनेच्या विरोधात ठराव मांडण्यात आला. महापालिकेत तीन सदस्यांऐवजी दोन सदस्यांचा ठराव काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. काल राज्यमंत्रिमंडळात तीन सदस्य प्रभाग रचनेला मंजुरी देण्यात आली होती. आज काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत दोन सदस्य प्रभाग रचनेच्या ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.

अधिक वाचा  किरण गायकवाड ‘देवमाणूस २’मध्ये दिसणार कि नाही?

“काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी आहे, अध्यक्ष आहेत. त्यांना काय वाटतं हा त्यांचा अधिकार आहे. कार्यकारिणीचा ठराव मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू. आमच्यात मतभेद नाहीत, तर मतमतांतर आहेत. पदाधिकाऱ्यांना त्यांचे विचार मांडण्याचे अधिकार आहेत” असे काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

काल बैठकीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांच्या याबाबत वेगवेगळ्या भूमिका होत्या, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली होती. मात्र, हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगतिलं होतं. महापालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची दोन सदस्य प्रभाग असावा अशी भूमिका होती तर शिवसेनेची चार सदस्य असावा अशी मागणी होती. पण अखेर तीन सदस्य प्रभाग पद्धतीला मंत्रीमंडळाने मंजूरी दिली. या बैठकीत अजित पवार यांनी दोन सदस्यीय प्रभागांची भूमिका मांडली. तर एकनाथ शिंदे यांनी चार सदस्यीय भूमिका मंडली.