भूज (गुजरात) : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमधून जप्त करण्यात आलेल्या तीन हजार किलोग्रॅम वजनाच्या हेरॉइनची किंमत ही तब्बल २१ हजार कोटी रुपये एवढी असल्याची माहिती महसूल गुप्तवार्ता संचलनालयाकडून (डीआरआय) देण्यात आली.

याबाबत ड्रग्जचे रॅकेट चालविणाऱ्या एका दाम्पत्याला चेन्नईमधून अटक करण्यात आली आहे. हे अमली पदार्थ अफगाणिस्तानातून येथे आणण्यात आल्याचे कळल्यानंतर ‘डीआरआय’ने कारवाईचा बडगा उगारला होता. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे नोंदणी असलेल्या एका कंपनीने हे अमली पदार्थ मागविले होते.

अर्धवट प्रक्रिया झालेले हे पावडरचे टणक गोटे आहेत. इराणच्या अब्बास बंदरातून ते गुजरातेतील मुंद्रा बंदरात आणण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, गांधीधाम आणि मांडवी या भागांत छापे घालण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून याप्रकरणी कारवाई सुरू होती.

अधिक वाचा  राष्ट्रवादीचे खासदार कोल्हेंची कोल्हेकुई? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची असण्याचं?; आनंद दवे यांचा सवाल

दाम्पत्याला कोठडी

एम. सुधाकर आणि त्याची पत्नी दुर्गा वैशाली यांच्या मालकीच्या अशी ट्रेडिंग कंपनीने हे हेरॉइन भारतामध्ये आयात केले होते. या दाम्पत्याला डीआरआयने चेन्नईतून अटक केली असून त्यांना कच्छ येथे आणले आहे. या दोघांनाही १० दिवसांची कोठडी सुनावली.