पुणे: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कात्रज चौकात आणि सिंहगड रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांचे भूमीपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता. २४) होणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि माजी आमदार योगेश टिळेकर उपस्थित होते.

कात्रज चौक तसेच कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी २०१५ पासून पाठपुरावा करत होतो. कात्रज येथे उड्डाणपूल करण्यात आला आहे, मात्र सातारा रस्त्याला जेथे हा पूल जोडला जातो, तेथील भूसंपादनातील अडचणीमुळे समस्या अद्यापही तशीच होती. दरम्यानच्या काळात, आमदार असताना देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग सरळ कात्रज कोंढवा रोडला जोडून तो राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर करावा, यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्याला यशही आले.

अधिक वाचा  सिंहगड रस्ता कागदावर ‘ड्रीम प्रोजेक्ट’ प्रत्यक्षात दिवसेंदिवस अर्धवट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बाह्यवळण मार्गाला सरळ जोडल्या जाणाऱ्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्याने मार्ग मोकळा झाला. यानंतर कात्रज-कोंढवा सहापदरी रस्त्याचे कामही सुरू झाले. नवीन उड्डाणपूल वंडरसिटी येथून राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या एका कोपऱ्यातून थेट राजस सोसायटी चौकापर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे कात्रज चौकातील वाहतूक कोंडीही कमी होणार आहे.

तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी दिली असून महापालिकेनेही उद्यानाच्या जागेत पुलाचे पिलर उभारण्यास परवानगी दिली आहे, असे टिळेकर यांनी सांगितले. महापौर मोहोळ म्हणाले, ‘‘सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे या मार्गावरील अगदी खडकवासल्यापर्यंतच्या नागरिकांचा वेळ वाचणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.’’

अधिक वाचा  परमबीर सिंह यांचं निलंबन? मुख्यमंत्री ठाकरेंकडून स्वाक्षरीही

…आणि भूमिपूजनाचा मार्ग मोकळा

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामाला तीन महिन्यांपूर्वी स्थायी समितीने मान्यता दिली आहे. परंतु उड्डाणपुलाच्या कामासाठी पुरेसा निधी नसल्याने अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद करण्यास मान्यतेचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे प्रलंबित राहिला आहे.

त्यामुळे समितीमध्ये मंजूर होऊनदेखील तीन महिन्यांपासून या पुलाच्या कामाची वर्कऑर्डरच दिलेली नाही. आज सर्वसाधारण सभा या प्रस्तावाला मंजुरी देईल, या भरवशावर संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डर द्यावी, असा प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला. त्यामुळे या पुलाच्या भूमिपूजन करणे शक्य झाले आहे.