पुणे : “भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे आतंकवादी, दरोडेखोर का बलात्कारी आहेत? त्यांनी कशामुळे कोल्हापुरात यायचं नाही? आता महाराष्ट्रात अधिकृतपणे आणीबाणी घोषित करा. सोशल मीडियावर लिहायचं नाही. ताबोडतोब नोटीस, अटक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं स्वातंत्र्य नाही”, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोष व्यक्त केला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर स्थानबद्धची जी कारवाई करण्यात आली त्यावर संताप व्यक्त केला.

नेमकं प्रकरण काय?

किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्याला जाण्याचं नियोजन केलं आहे. ते उद्या (20 सप्टेंबर) कोल्हापूरला दाखल होणार आहेत. पण त्याआधीच त्यांना मुंबईत स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसेच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस बजावली आहे. त्यामध्ये त्यांनी सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. पण किरीट सोमय्या हे कोल्हापुरला जाण्यावर ठाम आहेत. सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे सोमय्या उद्या मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यातही जाणार आहेत. त्यावर मुश्रीफ समर्थकांनी तुम्ही येऊनच दाखवा, असा इशारा दिलाय. याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांच्यावर मुंबईत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या घराबाहेर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यावर सोमय्या यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

अधिक वाचा  प्रियांका चतुर्वेदी यांनी निलंबनाच्या निषेधार्थ सोडले अँकरिंग

सोमय्या यांना लेखी नोटीस नाही’

“किरीट सोमय्यांना तुम्ही का अटक करणार आहात? त्याचं कारण द्या. अजूनही किरीट सोमय्या यांना लेखी नोटीस देण्यात आलेली नाही. किरीट सोमय्या वारंवार सकाळपासून नोटीस द्या, अशी मागणी करत आहेत. कधी आयजी समजवण्याचा प्रयत्न करतात. किती यंत्रणा दबावाखाली काम करतेय. गेल्या तीन दिवासांपासून मी लांबून पाहतोय. किरीट सोमय्या यांना मुंबईतल्या गणपती विसर्जनाला जाऊ दिलं जात नाहीय. त्यापेक्षा आणीबाणीच घोषित करा”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘किरीट सोमय्या दडपशाहीला घाबरनार नाहीत’

“माझं आणि सोमय्या यांचं सातत्याने बोलणं सुरु आहे. सोमय्या हे इतके आक्रमक नेते आहेत की ते असल्या दडपशाहीला घाबरनार नाहीत. जेव्हा झेड सुरक्षा नव्हती तेव्हाही ते फिरत होते. ज्यांना झेड सुरक्षा आहे त्यांना फिरायला बंदी करताय? किरीट सोमय्या उद्या हायकोर्टात जातील. ज्यांना झेड सुरक्षा आहे त्यांना तुम्ही फिरायला बंदी करताय तर तुम्ही सर्वसामान्यांचं वाटोळंच करणार”, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला.

अधिक वाचा  ओमिक्रॉनचे 7 रुग्ण; घाबरू नका, काळजी घ्या- महापौर

किती दिवस डांबून ठेवणार, घोटाळे बाहेर काढणारच’

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध केला आहे. त्यांनी या कारवाईवर ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. “हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची आणखी माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरला जाणार आहे. परंतु माझ्या दौऱ्यावर ठाकरे सरकारने प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्यासाठी माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवले आहेत. मला गणेश विसर्जनासाठीही जाऊ दिले जात नाही,” अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसेच मी उद्धव ठाकरे यांना चॅलेन्ज देतो. तुम्ही मला किती दिवस पोलीस ठाण्यात डांबून ठेवणार ? मी तुमचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

अधिक वाचा  "तुटेल एवढा ताणू नका"; परत जोडलं जाऊ शकणार नाही- अनिल परब

देवेंद्र फडणवीसांकडून निषेध व्यक्त

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. त्यांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करणं चुकीचं असल्याचं म्हटंलय. तसेच काहीही झालं तरी आमचा राज्य सरकारविरोधातील संर्घष सुरुच राहणार आहे, असं ठणकाऊन सांगितलंय.

माजी खा. किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.
राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील.