मुंबई: काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन झाल्याने राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केलेल्या असतानाच भाजपने मात्र, राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपला प्रथा परंपरेची आठवणच करून दिली आहे. त्यासाठी त्यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची आठवणच करून दिली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन ही आठवण करून दिली. प्रमोद महाजन यांचं निधन झाल्यानंतर राज्यसभेची निवडणूक लागली होती. मात्र, महाजन यांच्या जागी उमेदवार न देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. साधारणपणे एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्या जागी उमेदवार न देण्याची प्रथा आहे, असं सांगतानाच वेळ आल्यावर आम्ही भाजपला उमेदवार न देण्याबाबत विनंतीही करू, असं थोरात यांनी सांगितलं.

भाजपला विनंती करू

भाजपने राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केली. हे दुर्देव आहे. नेत्याच्या मृत्यूनंतर उमेदवार दिला जात नाही. राजकारणात काही संकेत असतात. तरीही आम्ही भाजपला उमेदवार न देण्याची विनंती करू. राजकारणात काही संकेत असतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अधिक वाचा  राऊतांचे सध्याचे नेते सोनिया, राहुल आणि प्रियंका - फडणवीस

भाजप वैफल्यग्रस्त

यावेळी त्यांनी भाजपकडून होत असलेल्या आरोपांवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप वैफल्यग्रस्त होऊन आरोप करत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी तशी कारवाई केली असेल, असं त्यांनी किरीट सोमय्यांवरील कारवाईचं समर्थन करताना सांगितलं. भाजप फक्त आज सरकार पडेल, उद्या सरकार पडेल अशा घोषणा करते, असा चिमटाही त्यांनी काढला. आमचं सरकार आल्यावर आम्ही सुडाचं राजकारण केलं नाही. आम्ही मागची काहीच प्रकरणं काढली नाही, असंही ते म्हणाले.

महाजनांच्या जागेवर बिनविरोध निवडणूक

2006मध्ये प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. त्यावेळी भाजपच्या विनंतीवरून काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. त्याचीच आठवण थोरात यांनी आज काँग्रेसला करून दिली आहे.

दोन घटना
राष्ट्रवादीचे प्रवक्ते वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं होतं. त्यावेळी त्यांच्या पत्नीने नोकरीचा राजीनामा दिला होता. पतीच्या जागेवर आपण राज्यसभेवर जाऊ असं वाटल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. पण त्यांना उमेदवारी न देता शरद पवारांनी सुप्रिया सुळेंचं नाव पुढे केलं होतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला होता, असं ज्येष्ठ राजकीय पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी सांगितलं. एखाद्या नेत्यांचं निधन झाल्यावर त्याच्या रिक्त होणाऱ्या जागेवर उमेदवार न देण्याची प्रथा परंपरा राहिली आहे, असंही त्रिवेदी यांनी सांगितलं.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

तर, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे उभ्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रीतम यांच्या विरोधा उमेदवार दिला नव्हता. मात्र, काँग्रेसने उमेदवार दिला होता. यावेळी प्रीतम यांना 9,16,923 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार अशोकराव पाटील यांना केवळ 2,24,678 मते मिळवली होती. प्रीतम या सुमारे 7 लाखाचं मताधिक्य घेऊन विजयी झाल्या होत्या. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही मतांचा विक्रम मोडला होता.

राज्यसभा निवडणूक; रजनी पाटील, संजय उपाध्याय रिंगणात

मुंबई : काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने माजी खासदार रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने संजय उपाध्याय यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे.

अधिक वाचा  कर्नाटकात ओमिक्रॉन : 2 आठवडे भारताला महत्त्वाचे- आरोग्य तज्ज्ञ

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू अशी रजनी पाटील यांची ओळख आहे. रजनी पाटील या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. विवाहानंतर त्या मराठवाड्यात स्थायिक झाल्या. माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील यांच्या त्या पत्नी. बीडमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. दुसरीकडे भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. ते मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. २०१७ मध्ये ते महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपने हिंदी भाषक चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे.