पुणे: पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या शिपाई पदासाठी येत्या 5 ऑक्‍टोबरला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच शारीरिक चाचणीच्या अगोदर लेखी परीक्षा घेतली जात आहे. त्यासाठी 22 सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र मिळेल.

पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या 214 जागांसाठी 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यानंतर या पदांसाठी 39,323 उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या साथीमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मात्र, आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु झाल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

12538 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर

अधिक वाचा  इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीत कोरोनाची तिसरी लाट; पोर्तुगाल, झेक रिपब्लिकमध्ये आणीबाणी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जानेवारी महिन्यात पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते. मात्र, मराठा आणि आता ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

पोलीस भरती प्रक्रियेतील बदलांविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा

यापूर्वी 2019 साली पोलीस भरती प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांविरोधात पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. पोलीस भरतीसाठी आधी 100 गुणांची मैदानी चाचणी घेतली जात होती.त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जात असे. अशाप्रकारे 200 गुणांतून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांची निवड केली जात असे.

अधिक वाचा  अवलियाचा जन्मदिनी भीमसंकल्प! चिन्हरुपी भस्मासुराचा वध!

पण आता राज्य सरकारने यामध्ये बदल केला होता. लेखी परीक्षा मैदानी चाचणीच्या आधी घेण्यात येणार आहे. तसेच मैदानी चाचणीचे गुण 100 वरुन 50 करण्यात आले होते. या निर्णयावर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता.