पुणे: पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने महापालिका हद्दितील समाविष्ट २३ गावांसह उर्वरित हद्दीचा प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. त्यावर महापालिकेने २३ गावात योग्य पद्धतीने विकास करता यावा यासाठी महत्त्वाचे २८ बदल सुचविले आहेत. प्रशासनातर्फे या सूचना पीएमआरडीएकडे नोंदविल्या गेल्या आहेत. यामध्ये पायाभूत सुविधा व रस्त्यांबाबत जास्त सूचना आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.

महापालिकेने मांजरी येथे राहुरी कृषी विद्यापीठाच्या जागेवर ४.६० हेक्टरचे मैला शुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले आहे. तर कदम वस्ती येथे पंपिंग स्टेशन आहे, त्यामुळे या जागा विकास आराखड्यात आरक्षीत करण्यात याव्यात. प्रारूप आराखड्यात निळी व लाल पूररेषा दाखवलेली नाही. त्यामुळे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे, शिवाजी बांधकाम परवानगी देताना अडचण होऊ शकते. त्यामुळे पूररेषाच निश्‍चीत करावी. मांजरीकडून साडे सतरा निळी येथे येणारा रस्ता व पूल आराखड्यात दर्शविलेला नाही, त्याचा समावेश करावा.

अधिक वाचा  वाचाल तर व्हाल थक्क ; तरुणीचं करायची अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार चक्क

तसेच उंड्री, शेवाळवाडी, फुरसुंगी, हांडेवाडी, औताडवाडी, उरळी देवाची या भागातील रस्त्याच्या रुंदीमध्ये तफावत आहे, भविष्यात त्यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यात बदल करावा. धायरी व नऱ्हे येथील रस्त्याच्या आखणीतील तफावत दूर करावी. धायरी-किरकटवाडी रस्त्यावर अनेक वळणे असल्याने हा रस्ता १८ मीटरचा दर्शविणे आवश्‍यक आहे. कोंढवे धावडे मधील नदीकाठचा रस्ता व उत्तमनगर-शिवणे रस्ता एक सलगतेने २४ मिटरचा होणे आवश्‍यक आहे.

२३ गावातील कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी प्रकल्प, कचरा डेपो, कचरा हस्तांतरण केंद्र आदी साठी आरक्षणे टाकावीत. होळकरवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, सणसनगर, शेवाळेवाडी येथे पाणी पुरवठा प्रकल्पासाठी विकार आराखड्यात आरक्षणे आहेत, पण उर्वरित गावात देखील ही आरक्षणे टाकावीत अशा सूचना महापालिकेने पीएमआरडीएला केल्या आहेत.