पुणे: राज्य सरकारच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत शिवभोजन थाळी यापुढेही सुरूच राहणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ३९ शिवभोजन केंद्रांवर दररोज सहा हजारांहून अधिक थाळ्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती अन्नधान्य वितरण विभागाकडून देण्यात आली.

मोफत शिवभोजन थाळी योजनेचा लाभ मिळण्याची अंतिम मुदत मंगळवारी (ता.१४) होती. परंतु राज्य सरकारने पुढील आदेश येईपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याचे आदेश अन्नधान्य वितरण विभागाला दिले आहेत. त्यानुसार नागरिकांना यापुढेही मोफत शिवभोजन थाळीचा लाभ मिळणार आहे. प्रारंभी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात १४ ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर केंद्रांची संख्या वाढवून ३९ करण्यात आली आहे. या केंद्रांच्या माध्यमातून शहरात दररोज ६ हजार ३८ नागरिकांना मोफत थाळी देण्यात येत आहे.

अधिक वाचा  राहुल भेटीनंतर राऊत म्हणाले, “तीन आघाड्या झाल्या तरी” काँग्रेसशिवाय एकजुट नाही,

केंद्र चालकांना प्रत्येक थाळीमागे ४० रुपये अनुदान दिले जाते. हे अनुदान पुरवठा विभागाकडून केंद्रचालकांच्या बँक खात्यात १५ दिवसाला जमा करण्यात येते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात शिवभोजन थाळीला प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे केंद्रांची संख्या वाढविण्याचे प्रस्तावित आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील स्थिती

 (१ सप्टेंबर २०२१ अखेर) :

शिवभोजन केंद्र : ३९

वाटप थाळ्यांची संख्या : १७ लाख ७८ हजार ५९५ (१ जानेवारी २०२० पासून)

अधिक वाचा  सरु आजीने डॉक्टराला दिली धमकी -‘देवमाणूस2'

मोफत थाळी कालावधी १५ एप्रिल २०२१ पासून आजतागायत

शिवभोजन थाळीतील पदार्थ : प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि १५० ग्रॅम भात

“शिवभोजन थाळीचा लाभ प्राधान्याने मजूर, गरजू, रुग्णांचे नातेवाईक, निराधार, भिकारी आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना चांगल्या पद्धतीने होत आहे. केंद्रांच्या तपासणीत आणि कामकाजात पारदर्शकता आणत नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्न देण्याचा प्रयत्न राहील.”

– सचिन ढोले, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर.