पुणेरी पाट्या म्हणजे जागतिक पातळीवर चर्चेचा विषय असल्याचं नेहमी म्हटलं जातं. त्यात बराच तथ्यांश देखील आहे. मात्र, याच पाट्यांच्या माध्यमातून एका पुणेकरानं ट्रॅफिक पोलिसांचा निषेध केला आहे. त्यासाठी त्यानं चक्क त्याच्या दुचाकीचं स्मारक उभारलं आहे. या स्मारकात गणेश मूर्तीची स्थापना करून त्यानं हा आगळा-वेगळा देखावा उभारला असून त्यावर आपली दुचाकी ठेवली आहे. सचिन धनकुडे नावाची ही व्यक्ती असून जून महिन्यात ट्रॅफिक पोलिसांनी उचललेली गाडी ८० दिवसांनंतर परत केली. झालेल्या मनस्तापाचा निषेध करण्यासाठी सचिन धनकुडे यांनी हे स्मारक उभारल्याचं सांगितलं.

काय आहे हे स्मारक?

अधिक वाचा  इराणमधील सफरचंदे बाजारात दाखल; सुकामेव्याची आवकही सुरळीत

कोथरूडच्या भुसारी चौकात स्मारक म्हणून उभारण्यात आलेल्या या बांधकामाच्या वर सचिन धनकुडे यांनी आपली दुचाकी ठेवली आहे. स्मारकाच्या बाहेरच्या बाजूला त्यांनी वेगवेगळे संदेश पाट्यांच्या डिझाईनवर लिहिले आहेत. यामध्ये, ‘भिऊ नकोस, पुढच्या चौकात पोलीस आहे’, ‘पार्किंगचे आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘माँ ने कहा शराब छोड दो बाबुजीने कहा घर छोड दो, पीछे बैठी पारू कह रही है सिग्नल तोड दो’, अशी वाक्य लिहिण्यात आली आहेत. यातून पार्किंग आणि वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करण्यासोबतच आपली गाडी चूक नसताना उचलली असल्याचा देखील त्यांनी निषेध केला आहे.

अधिक वाचा  जागतिक एड्स दिन २०२१: एड्स आजाराविषयी गैरसमज,इतिहास आणि महत्त्व सविस्तर वाचा

नेमकं काय झालं होतं?

१५ जून रोजी नो पार्किंगच्या जागेत गाडी लावलेली नसताना देखील ट्रॅफिक पोलिसांनी गाडी उचलून नेली होती. त्यानंतर वाहतूक शाखेत जाऊन त्यांनी घडला प्रकार सांगितला. तरीदेखील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची दुचाकी परत दिली नाही. शिवाय, या पोलिसांकडे नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याचा फोटो देखील नव्हता. अनेकदा पाठपुरावा करून देखील गाडी परत न मिळाल्याने अखेर गणेशोत्सवाचं निमित्त साधून सचिन धनकुडे यांनी भुसारी कॉलनी मित्रमंडळातर्फे गाडीचं स्मारक हाच देखावा उभारला. अखेर वाहतूक पोलिसांनी उचलून नेल्यानंतर ८० दिवसांनी त्यांना गाडी परत केली