डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे कोर्टाने पाच जणांवर आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. पाचही आरोपींनी यावेळी कोर्टात निर्दोष असल्याचं सांगितलं. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयापुढे ही सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी क्रमांक १, २, ३ आणि ५ असलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळककर आणि विक्रम भावे विरुद्ध हत्येचा कट रचल्याचा गुन्हा निश्चित केला आहे. त्याचबरोबर युएपीएच्या कलम १६ अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. दुसरीकडे आरोपी क्रमांक ४ वकील संजीव पुनाळेकर यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला आहे. आरोप निश्चित झाल्यानंतर आठ वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या खटल्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

आरोपी सचिन अंदुरे, विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर होते. तर आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे न्यायालयात उपस्थित होते. सीबीआयकडून विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी आणि बचाव पक्षाकडून वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली. यावेळी करोनाचे कारण सांगून आरोपींनी वकील आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आरोप निश्चितीस मुदत देण्याची विनंती केली. मात्र त्यावर न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार देत आरोप निश्चिती झाली असून गुन्हा कबूल आहे की नाही, अशी विचारणा केली. त्यावर आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचं सांगतिलं. आता यावर ३० सप्टेंबरला सरकार वकील आणि बचाव पक्षा मार्फत पुराव्यासंबंधीची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करणार आहेत.

अधिक वाचा  पराग अग्रवाल ट्विटरचे नवे CEO ; एकमताने निवड जॅक डोर्सी पायउतार

बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सीबीआयने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हल्लेखोरांच्या दाव्यातील विरोधाभासाचा संदर्भ दिला. सीबीआयने २०१६ मध्ये तावडे याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. तर फरार सनातन संस्थेचे सदस्य सारंग अकोलकर आणि विनय पवार हे दाभोलकरांवर हल्ला करणारे आरोपी होते. पण २०१८ मध्ये सीबीआयने अंदुरे आणि कळसरकर यांना अटक केली आणि हल्लेखोर असल्याचं सांगितलं. त्यानंतर सीबीआयने अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा या तिघांना अटक केली होती. मात्र त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलेले नाही. दुसरीकडे २०१७ मध्ये बंगळुरूच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी कळसकर यांच्या तिघांना आरोपी असल्याचं सांगण्यात आलं आहे. असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.

अधिक वाचा  CNG चे दर २ महिन्यांत ३री वाढ; १४ रुपयांनी वर्षभरात वाढले दर !

अंधश्रद्ध निमूर्लन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात हत्या करण्यात आली होती. अंधश्रद्धेविरूद्द जनजागृती करणारे ६७ वर्षीय डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावरून मॉर्निंग वॉक करत असताना दोन हल्लेखोरांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुणे शहर पोलिसांकडून २०१४ साली हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. आतापर्यंत ५ आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

आरोपींच्या अटकेचा घटनाक्रम

जून २०१६ मध्ये सीबीआयने प्रथम सनातचे सदस्य आणि इएनटी सर्जन डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली. त्यांच्याविरोधात आरोपपत्र सप्टेंबर २०१६ मध्ये दाखल करण्यात आलं होतं. तसेच हत्येच्या कटातील सूत्रधार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सीबीआयने २०१८ मध्ये सनातन संस्थेचे आणखी दोन सदस्य सचिन अंदुरे आणि शरद कळसेकर यांना अटक केली. या दोघांविरोधात पुरवणी आरोपपत्र फेब्रुवारी २०१९ मध्ये दाखल करण्यात आलं. या दोघांनी गोळ्या झाडल्याचं सीबीआयनं आपल्या आरोपपत्रात सांगितलं आहे. त्यानंतर मे २०१९ मध्ये सीबीआयने मुंबईतील वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना अटक केली. हे दोघंही सनातन या संस्थेशी जोडलेले आहेत. त्यांच्याविरोधात नोव्हेंबर २०१९ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं. पुनाळेकर आणि भावा यांनी पुरावे नष्ट करण्यात भूमिका बजावली असा आरोप सीबीआयने केला. तावडे, अंदुरे आणि कळसकर न्यायालयीन कोठडीत आहेत. तर पुनाळेकर आणि भावे जामिनावर बाहेर आहेत.