नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. या दोन दिवसात त्यांनी एक दोन नव्हे तर आठ केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी कर्जत-जामखेडच्या विकासावर या नेत्यांशी चर्चा केली. तसेच कर्जत-जामखेडमध्ये आणावयाच्या विकास योजना आणि या मतदारसंघातील प्रश्नांवर रोहित पवारांनी या मंत्र्यांशी चर्चा केली.

रोहित पवार यांनी गेल्या दोन दिवसात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय समाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंग यांची त्यांनी भेट घेतली. केंद्राच्या योजना मतदारसंघात कशा आणता येतील यावर रोहित पवार यांनी या मंत्र्यांशी चर्चा केली.

कौशल्य विकास योजना राबवणार

पवार यांनी आज केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची भेट घेतली. अल्पसंख्याक समुदायातील पारंपरिक कला/हस्तकलेतील कौशल्य विकासासाठी कर्ज-जामखेड मतदारसंघात USTTAD योजना राबवणं आणि इतरही योजनांबाबत पवार यांनी नकवी यांच्याशी चर्चा केली. यावर त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं.

ज्योतिरादित्य शिंदेंना कर्जत-जामखेडला येण्याचं निमंत्रण

पवार यांनी आज केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. कर्जत-जामखेडमधील खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात भगव्या ‘स्वराज्य ध्वजा’चं पूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण यावेळी त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना दिलं.

खर्ड्याच्या ऐतिहासिक लढाईत अनेक शूरवीर सरदारांनी, योध्यांनी अतुल्य पराक्रम गाजवला. यामध्ये श्रीमंत तुकोजीराजे शिंदे यांचे नातू राजे दौलतराव शिंदे यांचाही समावेश होता. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्यांनी निजामाच्या फौजांना सळो की पळून करून सोडलं होतं. इतिहासाच्या याच धाग्यातून ज्योतिरादित्य शिंदेयांची दिल्लीत भेट घेऊन खर्डा किल्ल्यात उभारण्यात येणाऱ्या ‘स्वराज्य ध्वजा’च्या कार्यक्रमाचं त्यांना निमंत्रण दिलं. यावेळी इतरही विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली, असं पवार म्हणाले.

अधिक वाचा  शनिदेवाची या राशीवरच विशेष कृपा; अन् मेहनती आणि दयाळूही

आवाज योजनेवर चर्चा

केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंग यांचीही त्यांनी भेट घेतली. प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील तरतुदी, सूट आणि विस्तार याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली. कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीणचे जवळपास 10 हजार लाभार्थी आहेत. यामध्ये काही लाभार्थ्यांच्या घरांचे हप्ते बाकी आहेत, काही नागरिकांची नाव ही ‘ड’- यादीमध्ये येऊनसुद्धा त्यांची नावे काही कारणांनी वगळण्यात आली आहेत.

मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या निवारणासाठी राबविण्यात आलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून अशा अनेक अडचणी कर्जत-जामखेड मतदारसंघात असल्याचे निदर्शनास आले. या सर्व समस्या समजून घेऊन याविषयी राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी ही समस्या केवळ कर्जत-जामखेड मतदारसंघापुरती मर्यादित नसून सर्व राज्याला या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे कळाले, असं पवार यांनी सांगितले.

आवास योजनेचे नियम शिथिल करा

मनरेगामध्ये राज्यात प्रधानमंत्री आवास योजना/ राज्य योजनेच्या 52.6% घरांची कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना /राज्य योजनेतील घरकामासाठी घरांच्या हप्त्यानुसार टप्प्याटप्प्याने मस्टर जारी करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे मस्टरची काही रक्कम थकीत आहे. अशा प्रलंबित घरांच्या मस्टरसाठी मुदतवाढ द्यावी.

अधिक वाचा  पुण्यात भरदिवसा सहा गोळ्या झाडून काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

प्रधानमंत्री आवास योजना, आवास प्लस अंतर्गत लाभार्थी अंतिम करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. त्यात आवास यादीतून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आहेत, हे निकष शिथिल करावे, श्रेण्यांसाठी लक्ष्य वाढविणे, घराची किंमत 2 लाख रुपये पर्यंत वाढवणे, काही पात्र कुटुंबांना चुकीच्या माहिती अपलोड केल्यामुळे सिस्टममधून वगळण्यात आले आहे यासाठी माहिती संपादनाची अद्ययावत सुविधा प्रदान करावी आणि विविध तांत्रिक समस्यांमुळे अनेकजण नोंदणी करू शकले नाहीत. अशा पात्र लाभार्थ्यांसाठी नोंदणी विंडो आणखी 15 दिवसांसाठी पुन्हा उघडण्याची परवानगी देण्यात यावी आणि महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांचा विचार करावा ही विनंती पवार यांनी गिरीराज सिंग यांना केली.

राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करा

रोहित पवार यांनी काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा केली. कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक प्रभाव हा असंघटीत क्षेत्रातील महिला आणि कामगारांवर पडला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ग्रामीण भागातील गरिबीचा सापळा तोडण्यात यशस्वी सिद्ध झाला आहे, यामुळे ग्रामीण दैनंदिन मजुरी करणाऱ्या कामगारांचे राहणीमान सुधारले आहे.

ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे, लिंग समानता सुधारणे, स्थानिक राजकारणात सहभाग वाढवणे, सार्वजनिक संपत्ती वाढवण्यास मदत झाली आहे. याच धर्तीवर शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा यासाठी पवार यांनी निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.

वयोश्री योजनेत नगरला घ्या

अधिक वाचा  ४ डिसेंबरला का साजरा केला जातो? भारतीय नौदल दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्व

त्यानंतर त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची भेट घेऊन राष्ट्रीय वयोश्री योजनेत- RVY अहमदनगर जिल्हा समाविष्ट करण्यासाठी निवेदन दिले. RVY ही देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भौतिक सहाय्य आणि सहाय्यक-जीवन उपकरणे पुरवण्यासाठी एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे. ही योजना दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. ज्याचा उपयोग येथील नागरिकांना होईल. अहमदनगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा असताना देखील समाविष्टीत नसल्याने करण्यात आले नसल्याने याचा समावेश करण्यात यावा, अशी विनंती केली जेणेकरून जिल्ह्याला आणि पर्यायाने कर्जत आणि जामखेडला याचा फायदा होईल.

अल्पसंख्याकाच्या योजना नगरमध्ये राबवा

तसेच केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचीही पवार यांनी भेट घेऊन USTTAD च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यांचा समावेश करण्याची विनंती नकवी यांना निवेदनाद्वारे केली. याचसोबत अल्पसंख्याकांच्या इतर योजनांची अहमदनगर जिल्हा आणि कर्जत – जामखेडमध्ये प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी विनंती केली.

या नेत्यांशीही चर्चा

पवार यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्ते आणि महामार्गांबाबत चर्चा केली. यावेळी गडकरी यांनी महामार्गाच्या प्रश्नात लक्ष घालून हा प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन पवार यांना दिलं. रोहित पवार यांनी मीडियाशी बोलताना तशी माहिती दिली. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांचीही त्यांनी भेट घेऊन मतदारसंघातील विषयांवर चर्चा केली. तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना भेटून मतदारसंघातील बँकांच्या अडचणी आणि शाखांची संख्या वाढविण्याबाबत चर्चा केली.