शनिवार दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करताना भाविक भक्तांना कोथरूडवासियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले किंबहुना अनेक नागरिकांना आपल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन हौद शोधात फिरावे लागत होते. सायंकाळी पाच वाजले तरी काही ठिकाणी फिरत्या विसर्जन हौदां मध्ये टँकरद्वारे पाणी भरण्याचे कामच सुरू होते. त्यामुळे कोथरूडवासीय गणेश भक्तांना आपल्या घरच्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले,त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

मुंबईसारख्या शहरांमध्ये देखील समुद्राच्या पाण्यामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन केलं जात आहे. परंतु पुणे शहरामध्ये कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नदीपात्रामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मज्जाव केलेला आहे आणि त्यामुळेच फिरत्या हौदांची निर्मिती केली आहे. परंतु सायंकाळी सहा वाजले तरीही सदर विसर्जन हौद गणेश मूर्तींच्या विसर्जना करिता उपलब्ध झाले नव्हते. कोथरूडच्या थोरात उद्यानामध्ये तर जी विसर्जन व्यवस्था केली होती, तेथे पाण्याने हौद भरलेला होता परंतु नागरिकांना हौदामध्ये आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू दिले जात नव्हते. पालिका कर्मचारी नागरिकांना आपल्या गणेश मुर्ती आमच्याकडे दान करण्याचे सांगत होते मग त्या पाण्याने भरलेल्या हौदाचे काय प्रयोजन हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.त्यामुळेच शास्त्रानुसार पाण्यामध्ये मुर्तींचे विसर्जन न करता आल्यामुळे कोथरूड मधील नागरिकांच्या भावना दुखावल्याचे चित्र दिसून आले.

अधिक वाचा  नुपूर शर्मा प्रकरण: अहमदनगर जिल्ह्यातील व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आणखी 10 जणांना अटक

पुणे शहरामध्ये दीड दिवसांच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाची संख्या तुलनेने कमी असते. आणि म्हणूनच नागरिकांच्या रोषाला पालिकेला सामोरे जावे लागले नाही. मात्र पाचव्या,सातव्या आणि शेवटच्या म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तींच्या विसर्जनाची संख्या मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळेच पालिका व्यवस्थापनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवून नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, त्यांची गैरसोय होणार नाही आणि त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची जबाबदारी घेतली पाहिजे.

घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झालेल्या त्रासामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड उपविभाग अध्यक्ष संजय काळे यांच्या समवेत गणेश शिंदे, सचिन विप्र,प्रशांत पायगुडे,अरुण हुलावळे, नितीन गायकवाड, शाखाध्यक्ष विराज डाकवे,प्रकाश अडसूळ, शुभम चोरगे, किरण उभे, किरण जोशी, आनंद पाटील यांनी आज कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे आरोग्य निरीक्षक राम सोनवणे तर वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांना भेटून गणेश मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेमधील त्रुटी दूर करून सर्वसामान्य नागरिकांना, गणेश भक्तांना गणेशमूर्तींचे विसर्जन करताना होणारा मनस्ताप दूर करून दिलासा मिळवून देण्याचे आवाहन केले अन्यथा नागरिकांच्या भावना जपण्यासाठी आम्हास तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा देण्यात आला.