मुंबई: महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शिवसेना गोवा, उत्तर प्रदेशातही मविआचा प्रयोग करणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तशी घोषणाच केली. तसेच गोव्यात 20-21 तर उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 80 ते 100 जागा लढवणार असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली. गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात 20 ते 21 जागा लढवणार आहोत. तसेच उत्तर प्रदेशातही आम्ही 80 ते 100 जागा लढवू, असं सांगतानाच गोव्यात महाविकास आघाडी सारखा प्रयोग करू शकतो. गोव्याच्या आघाडीत योग्य स्थान मिळालं तर आम्ही आघाडीत जाऊ शकतो.

अधिक वाचा  कर्वेनगरला विद्युत रोषणाई उदघाटन सोहळा संपन्न

उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असं राऊत यांनी सांगितलं. गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपची गुजरातमधील स्थिती बिकट

भाजपने गुजरातचा मुख्यमंत्री बदलला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्याचा मुख्यमंत्री बदलणं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलले. यापूर्वी काँग्रेसनेही मुख्यमंत्री बदलले. हा त्या पक्षाचा अंतर्गत संरचनेचा भाग आहे. त्यावर इतरांनी बोलू नये. पण एक सांगतो गुजरातमध्ये भाजपची स्थिती बरी नाही. पाच वर्षापूर्वी भाजपला काठावरचं बहुमत मिळालं. ते बहुमत आणण्यात आलं. बिहारमध्ये शेवटच्या क्षणी काही जागा जशा खेचून आणल्या तेच गुजरातमध्ये झालं, असा चिमटा काढतानाच पक्ष मजबूत करणं हा त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. त्यामुळे त्यावर बोलणं उचित होणार नाही, असंही ते म्हणाले.

अधिक वाचा  राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याच्या निकटवर्तींयांच्या घरी छापा

चंद्रकांत पाटील अफवा पसरवतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कानाखाली मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, असं ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने मला सांगितलं होतं, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

एक मंत्री कोण? असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. आणि कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाहीत. चंद्रकांत पाटील किंवा अन्य कुणी अशा अफवा पसरवित असतात. त्यांना आनंद मिळतो. त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. पण महाविकास आघाडीचं सरकार तीन वर्षे चालेल. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. त्याबाबत त्यांनी निश्चित राहावं, असा टोलाही त्यांनी लगावला.