महाराष्ट्रात मातंग समाजावर ठिकठिकाणी होणाऱ्या अन्याय अत्याचारा संदर्भात नुकतीच विविध पक्षामधील मान्यवरांसह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष व लहुजी वस्ताद स्मारक समितीचे अध्यक्ष विजय(बापू) डाकले यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. मागील वर्षभरामधील विविध घटनांची माहिती देऊन संबंधीत आरोपींवर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच पिडीत समाजबांधवाना संरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी समाजाच्या वतीने राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांना करण्यात आली.

सदर बैठकीत चिंचवड (पुणे) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन आरोपींना त्वरीत अटक करुन आरोपींना मोक्का लावावा. तसेच पीडित मुलीला व तिच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशीही मागणी केली आहे.

अधिक वाचा  कुसुमाग्रज निवासस्थानापासून वाजत गाजत ग्रंथदिंडी; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!

याप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील सर्व प्रकरणांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच चिंचवड घटनेसंदर्भात पोलिस आयुक्त कृष्णकुमार यांना लगेच कार्यवाही करण्याचे आदेश दिले. शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब भांडे, आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव साठे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर नेटके, वैजनाथ वाघमारे, रामभाऊ कसबे उपस्थित होते.