पुणे : १९९९ पूर्वी प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान होता, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात दुसऱ्या जातींबद्दल तिरस्कार वाढला. आज काल राजकारण त्यावरच चालू आहे. अशा दूषित वातावरणापासून तुम्ही सावध रहा. आपल्या पक्षात जातपात चालणार नाही. जात बघून पदे दिले जात नाही, या जातीपातीची चर्चा सुद्धा पक्षात करू नका, अशी तंबी देतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सावध केले.

मनसेच्या नवनिर्वाचित शाखा अध्यक्ष व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नवी पेठेतील ज्ञानल मंगल कार्यालयात राज ठाकरे यांनी घेतली. त्यावेळी मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष वसंत मोरे उपस्थित होते. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीमुळे जातीद्वेष वाढला असे वक्तव्य यापूर्वी केले होते. पण आता थेट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देखील भूमिका स्पष्ट केली.

अधिक वाचा  बार्बाडोस प्रजासत्ताक; ब्रिटनच्या राणीचा ४०० वर्षांचा अंमल संपला

फ्लेक्सवर गॉगल लावलेला फोटो बघून लोकांमध्ये तुमच्याबद्दल प्रेम वाढत नाही तर तिरस्कार वाढतो हे लक्षात घ्या. ही असली फ्लेक्सबाजी करण्यापेक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांकडे गेलो की आपल्या समस्या सुटतात, कामे होतोच असा विश्‍वास लोकांच्या मनात निर्माण करा. निवडणूका येतात जातात, भाजप, शिवसेना किती वर्ष निवडणुका हारत होते, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे निवडणुकांचा विचार न करता काम करा. पक्षात जातपात चालणार नाही, त्यापासून दूर रहा, असा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

अधिक वाचा  Omicron Variant ची ही लक्षणं!; डेल्टा पेक्षा ओमायक्रोन हा फरक

मनसेच्या पक्षसंघटनेत शाखा अध्यक्ष हे पद सर्वात महत्त्वाचे आहे. फ्लेक्सवर गॉगल घातलेला फोटो टाकणे हे शाखा अध्यक्षांचे काम नाही. तर लोकांमध्ये जा, तुमचा जनसंपर्क वाढवा. समस्या घेऊन गेल्यानंतर त्या सुटतातच असा विश्‍वास निर्माण करा. फ्लेक्स, बॅनर लावल्याने तिरस्कार वाढतो. त्याऐवजी नागरिकांना वाढदिवसानिमित्त ग्रीटिंग, बुके पाठवा, त्यातून आपुलकी निर्माण होईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेना, भाजपला सत्तेत येण्यासाठी किती वर्ष लागली याचा विचार करा. ९९ वेळा प्रयत्न केल्यानंतर १०० वा दगड बरोबर लागते. तसेच निवडणुकीचे आहे. आपल्याला प्रयत्न करत राहावे लागणार आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, कोकणात पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सर्वात चांगले काम केले याचे अभिनंदन ठाकरे यांनी केले, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.