बीड : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या, अनेकांचा भांडाफोडसाठी येत असल्याचे जाहीर करणाऱ्या, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा रविवारी (ता. पाच) परळीत दाखल झाल्या. दरम्यान, त्यांच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.

सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल करत परळीत येऊन अनेकांचा भांडाफोड करणार असल्याचे करुणा यांनी म्हटले होते. वैद्यनाथ मंदिरात पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आगमनासह त्या काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागले होते. पोलिस प्रशासनाने शहरासह वैद्यनाथ मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता.

ठरल्यानुसार करुणा या दुपारी वैद्यनाथ मंदिर परिसरात आल्या. त्यावेळी विशाखा रविकांत घाडगे व गुड्डी तांबोळी या महिलांबरोबर त्यांची बाचाबाची झाली. ‘तुम्ही पैसे घेऊन इथे आला आहात असे म्हणत करुणा यांनी गुड्डी तांबोळी, विशाखा घाडगे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, जिवे मारण्याच्या उद्देशाने गुड्डी तांबोळी हिला चाकू मारला, अशा आशयाची तक्रार विशाखा घाडगे यांनी दिली. त्यानुसार परळी पोलिस ठाण्यात करुणा यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. गुड्डी तांबोळी यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक सुनील जायभाय तपास करीत असून करुणा व अरुण मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबाजोगाई येथील न्यायालयात सोमवारी (ता.सहा) त्यांना हजर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मुंडे समर्थकांची घोषणाबाजी

करुणा शर्मा परळीत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणाबाजी केली. मंत्री धनंजय मुंडे यांची बदनामी करत असल्याचा आरोप करून करुणा शर्मा यांच्यावर कारवाईची मागणी केली.

 

 

 

 

 

 

 

 

—–
पुणे : खर्च केला पण, आम्हाला नाही कळला? नागरिकांचा सवाल

सहकारनगर : शहरातील विकास हा नागरिकांच्या करातून केला जातो मात्र हा विकास नागरिकांच्या हितासाठी खर्च केला जातो का? किंवा योग्य केला जातो का? यासाठी पुण्यात प्रथमच स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकारनगर नागरिक मंचाची स्थापना केली. या मंचाची वतीने सहकारनगर सातव हॉल येथे वार्ड सभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रशासन व नगरसेवक यांच्या कामाचा आढावा घेत नगरसेवक, प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांनी प्रश्नाचा भडीमार करून अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

यामध्ये वाढती अतिक्रमणे, रस्ते, खेळाची मैदाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, भटकी कुत्री, अनाधिकृत प्लेक्सचे जाळे, कचरा, नावांच्या पाट्या, मोहल्ला कमिटी इ.अनेक विविध मुद्द्यावरून प्रभाग 35 मधील नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि नगरसेवक यांना धारेवर धरत अनेक प्रश्न मांडले. यामध्ये पदपथावरील अतिक्रमणे, महापालिकेकडून केले जाणारे अतिक्रम, अनधिकृत जागावर उभी असलेल्या बहुतांश पोलिस स्टेशन, आरोग्य कोटी, फेरीवाला राष्ट्रीय हॉकर्स पॉलिसीची अंमलबजावणी इ. नागरिकांनी प्रश्न उपस्थित करून सध्या सहकारनगरमध्ये मोठ्या प्रमाणात खोदाई करून रस्ते खराब केल्याने गॅस पाईपलाईन, समान पाणीपुरवठा योजनासाठी केलेली खोदाई व पुन्हा रस्ते केले जात नाहीत, अशी तक्रार करीत त्यासाठीचा खर्च कोण करते? तसेच कामाचे ऑडिट केले जाते का? सोसायटी व रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या नावाच्या पाट्या कोणाच्या खर्चातून करता? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

तसेच पावसाळ्यात रस्त्यावर गुडघाभर पाणी येते चेंबर तुंबतात, नाले सफाई व पावसाळ्या पूर्वीची पूर्ण कामे झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक महेश वाबळे, आबा बागुल, अश्विनी कदम, सुभाष जगताप, परिमंडळ उपायुक्त जयंत भोसेकर, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार इ. उपस्थित होते. या उपक्रमात आयोजन सहकारनगर नागरिक मंच यांनी केले. यावेळी इंद्रनील सदगरे, इंद्रजित चिखलीकर, अमित अभ्यंकर, प्रसन्नजीत फडवणीस, नितीन करंदीकर यांनी वार्ड सभा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी परिमंडळ तीनचे उपायुक्त जयंत भोसेकर यांनी उत्तर देताना म्हणाले, नालेसफाईचे काम वर्षभर सुरू असते आणि वर्ष भर केलेल्या कामाचे ऑडिट केले जाते, असे सांगितले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तात्काळ बस सेवा सुरळीत सुरू करून सहकारनगर ते स्वारगेट या मार्गावर सोमवार पासून पाच रुपयात अटल बससेवा सुरू केली जाईल, अतिक्रमण संदर्भात येत्या आठवड्यात सहकार नगर मध्येच बैठक घेतली जाईल. मोहल्ला कमिटीच्या बैठका नियमितपणे घेतल्या जातील असे सांगत नागरिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील संवादाच्या दृष्टीने सहकार नागरिक मंचाने राबवलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक सुभाष जगताप, आबा बागुल, अश्विनी कदम, महेश वाबळे यांनी उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देत आपली मनोगते व्यक्त केली.

अधिक वाचा  ओमिक्रोन व्हेरिएंटनं चिंतेत वाढ; निर्बंध लागणार ?; पवार हे म्हणाले..

नागरिकांच्या प्रमुख मागण्या :

सहकारनगर मधील वाढती अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करावा.

पुरेशी बससेवा उपलब्ध करावीत.

सहकारनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी दूर हरवलेले क्षेत्रीय कार्यालय जवळ आणावे

भटक्या कुत्र्यांच्याकडे गांभीर्याने पाहावे

पूरग्रस्तांचे भूखंड त्वरित नांवावर करून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

खोदाई केलेले रस्ते पूर्ववत करावेत

सहकारनगर नागरिक मंचतर्फे आयोजित या वार्ड सभेत वस्त्यांमधील नागरिकांना स्थान दिले गेले नसल्याचा दावा काही नागरिकांनी केला आणि सभेत गोंधळ घालत सहकारनगर मधीलच नागरिकांचे प्रश्न आहेत का?झोपडपट्टी मधील नागरिकांच्यासमस्याकडे लक्ष द्यावे असे म्हणत नगसेवक व प्रशासनाचे लक्ष वेधले. शेवटी त्यांनाही प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली.

पुणे तिथे काय उणे असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं पुणेरी पाट्याची मिश्किल यांचं महत्त्व आहे त्याच प्रमाणे सहकारनगर नागरिक मंचाने सातव हॉल येथे प्रभाग 35 मधील कामाचा लेखाजोखा स्क्रीनवरती दाखवला. न केलेले कामाचा आढावा घेत उद्यानात ब्लॉक बसवून जॉगिंग ट्रॅक केला असे स्क्रीनवरती दाखवले हा पाहिला का ? असे नगरसेवक ,प्रशासन व नागरिकांना दाखवला पण प्रत्येक्षात मात्र जॉगिंग ट्रकचे कामच केले नसल्याने निदर्शनास आणून दिले. असे विविध प्रश्नाचा व तक्रारीचा पाढा मांडत मनपा प्रशासन व नगसेवक यांच्या कामावर नाराजी व्यक्त करीत निशाणा साधला.

प्रथमच सहकारनगर नागरीक मंचाने प्रभाग 35 मधील नागरिकांच्या प्रश्नासाठी वार्ड सभेचे आयोजन केले. या सभेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला नागरिकांनी गर्दी करत अनेक समस्या व प्रश्न उपस्थित केले.
—–
जातीवादावरुन राष्ट्रवादीला राज ठाकरेंनी पुन्हा डिवचलं

पुणे : १९९९ पूर्वी प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान होता, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात दुसऱ्या जातींबद्दल तिरस्कार वाढला. आज काल राजकारण त्यावरच चालू आहे. अशा दूषित वातावरणापासून तुम्ही सावध रहा. आपल्या पक्षात जातपात चालणार नाही. जात बघून पदे दिले जात नाही, या जातीपातीची चर्चा सुद्धा पक्षात करू नका, अशी तंबी देतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सावध केले. मनसेच्या नवनिर्वाचित शाखा अध्यक्ष व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नवी पेठेतील ज्ञानल मंगल कार्यालयात राज ठाकरे यांनी घेतली. त्यावेळी मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष वसंत मोरे उपस्थित होते. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीमुळे जातीद्वेष वाढला असे वक्तव्य यापूर्वी केले होते. पण आता थेट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देखील भूमिका स्पष्ट केली.

फ्लेक्सवर गॉगल लावलेला फोटो बघून लोकांमध्ये तुमच्याबद्दल प्रेम वाढत नाही तर तिरस्कार वाढतो हे लक्षात घ्या. ही असली फ्लेक्सबाजी करण्यापेक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांकडे गेलो की आपल्या समस्या सुटतात, कामे होतोच असा विश्‍वास लोकांच्या मनात निर्माण करा. निवडणूका येतात जातात, भाजप, शिवसेना किती वर्ष निवडणुका हारत होते, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे निवडणुकांचा विचार न करता काम करा. पक्षात जातपात चालणार नाही, त्यापासून दूर रहा, असा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मनसेच्या पक्षसंघटनेत शाखा अध्यक्ष हे पद सर्वात महत्त्वाचे आहे. फ्लेक्सवर गॉगल घातलेला फोटो टाकणे हे शाखा अध्यक्षांचे काम नाही. तर लोकांमध्ये जा, तुमचा जनसंपर्क वाढवा. समस्या घेऊन गेल्यानंतर त्या सुटतातच असा विश्‍वास निर्माण करा. फ्लेक्स, बॅनर लावल्याने तिरस्कार वाढतो. त्याऐवजी नागरिकांना वाढदिवसानिमित्त ग्रीटिंग, बुके पाठवा, त्यातून आपुलकी निर्माण होईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना, भाजपला सत्तेत येण्यासाठी किती वर्ष लागली याचा विचार करा. ९९ वेळा प्रयत्न केल्यानंतर १०० वा दगड बरोबर लागते. तसेच निवडणुकीचे आहे. आपल्याला प्रयत्न करत राहावे लागणार आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, कोकणात पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सर्वात चांगले काम केले याचे अभिनंदन ठाकरे यांनी केले, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
—–
मी कृषीमंत्री असताना पिकाला योग्य भाव देत होतो – शरद पवार

पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी पीक फेकून देत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या संतापाचा उद्रेक होत असून या निमित्ताने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. माझ्याकडे कृषी खाते असताना शेतकर्‍यांच्या पिकाला योग्य भाव देत होतो, असे शरद पवारांनी सांगितले आहे. मात्र, सध्या लक्ष दिले जात नसल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

अधिक वाचा  ठाकरेंवर ममता बॅनर्जींना विश्वास; म्हणाल्या “आम्ही पुरुन उरलो, सरकारी दहशतवाद्यांचा महाराष्ट्रही…

सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव महादेव तथा दादासाहेब काळे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळाव्यानिमित्त शरद पवार उपस्थित होते. जुन्नरमधील या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवारांनी शेतकर्‍यांचा मुद्दा उपस्थित केला.

तोडणीचा खर्चही निघत नसून शेतकरी पीक फेकून देत आहेत. कांद्याचा खर्चही निघत नसून अन्य गोष्टींनाही किंमत मिळत नाहीये. माझ्याकडे १० वर्षीय केंद्रीय कृषी खाते होते. शेतकर्‍याच्या मालाला योग्य भाव देणे यावेळी मी कटाक्षाने पाळले. यामुळे शेतकरी या देशाची भूक भागवतोच. मात्र, संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवण्याची कामगिरी करू शकतो. शेतकर्‍यांनी हे करून दाखवले आहे, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले. पण दुर्दैवाने केंद्र सरकारमध्ये यासंदर्भात गरज आहे तितके लक्ष दिले जात नाही आहे. त्यामुळे शेतमालाच्या किमती घसरताना दिसत आहे, असा आरोपही यावेळी शरद पवारांनी केला.

जुन्नरच्या हापूस आंब्याची एक वेगळी ओळख वाढली याचा अभिमान यासोबत येथील भाजीपाला खराब होऊ नये यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली तर शेतकर्‍यांना या नुकसानीतून वाचविता येईल, असा सल्ला पवार यांनी मार्केट कमिटीला दिला.
—–
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन तात्पुरते मागे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे पूरग्रस्तांच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनाचा निर्णय माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी सायंकाळी अखेर मागे घेतला. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली. दरम्यान, बैठक निष्फळ झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. गेले पाच दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पंचगंगा परिक्रमा पदयात्रा सुरू होती.

नृरसिंहवाडी येथे ही पदयात्रा सायंकाळी पोहोचली. तेथे झालेल्या सभेत शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा केली. राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतचा प्रस्ताव इचलकरंजीचे प्रांताधिकारी विकास खरात यांनी शेट्टी यांना दिला. त्यानंतर शेट्टी यांनी हे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे या भागातील शेतकरी आणि इतर सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्वांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करावी, शेतकर्‍यांना पन्नास हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान तातडीने द्यावे यासह विविध मागण्यांसाठी शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून तीन हजारांवर कार्यकर्ते जलसमाधी घेण्यासाठी नृसिंहवाडीच्या दिशेने आले होते. काही कार्यकर्त्यांनी थेट पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमात उडी मारल्याने वाडीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पाच दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रयाग चिखली येथून पंचगंगा परिक्रमा यात्रा काढली. दुपारनंतर यात्रा कुरूंदवाड येथून वाडीच्या दिशेने निघाली. कुरुंदवाडच्या पुलावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हजारावर पोलीस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी सज्ज होते. पण कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्यामुळे तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती.

—–
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ!

पुणे : अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र नुकतेच महापौर मोहोळ यांना परिषदेकडून प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय महापौर परिषद ही राष्ट्रीय स्तराववरील महापौरांची परिषद असून परिषदेचे अध्यक्ष आणि आग्र्याचे महापौर नवीन जैन यांनी महापौर मोहोळ यांची निवड उपाध्यक्षपदी केली आहे. महापौर मोहोळ यांच्या निमित्ताने पुणे शहराला हा बहुमान मिळाला आहे. (Pune News)

महापौर मोहोळ म्हणाले, ‘आपल्या कामाची आणि पदाला न्याय देण्याची दखल घेतली जाते. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान देणारे आहे. हे राष्ट्रीय पातळीवर पद म्हणजे केवळ माझाच नाही तर तमाम पुणेकरांचा सन्मान आहे. यामुळे काम करण्याचा उत्साह तरआणखी वाढेलच शिवाय जबाबदारीची जाणीवही आणखी घट्ट होत आहे.’

अधिक वाचा  Railway Recruitment 2021: विविध पदांसाठी होणार भरती,काय आहे तपशील, जाणून घ्या

‘महापौरपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने माझ्याकडे दिल्यानंतर पदाला न्याय देण्याचा, झोकून आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळातही अशीच वाटचाल सुरु राहील. पुणे शहराला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासोबतच शहराच्या शाश्वत विकासावर याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही. हे शिवधनुष्य आगामी काळातही पेलू. संपूर्ण कारकिर्दीत पुणेकरांची लाभलेली साथ आणि आमच्यावर दाखवलेला विश्वास हाही या टप्प्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे’.
—–
ममतांनी निवडला सुरक्षित मतदारसंघ; मुख्यमंत्रीपद राखणार?
कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवूनही स्वतः नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आता भवानीपूर येथून पोटनिवडणूक लढणार आहेत. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी त्यांना निवडून येणं गरजेचं असल्यानं त्या पुन्हा निवडणूक रिंगणार उतरल्या आहेत. ३० सप्टेंबर रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे.

पश्चिम बंगालचे कृषीमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोभानदेब चटोपाध्याय यांनी मे महिन्यात आपला आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची भवानीपूरची जागा रिक्त झाली होती. चटोपाध्याय यांनी विधानसभा अध्यक्ष बिमन बंडोपाध्याय यांच्याकडे पक्षाचे वरिष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांच्या उपस्थितीत आपला राजीनामा सोपवला होता.

भवानीपूरच्या जागेसह जंगीपूर आणि समसेरगंज या जागांवरही पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये भवानीपूरमधून ममता बॅनर्जी तर जंगीपूरमधून तृणमूलचे जाकीर हुसैन आणि समसेरगंज येथून अमिरुल इस्लाम हे निवडणूक लढवत आहेत.

पश्चिम बंगालमधील समसेरगंज आणि जंगीरपूर आणि ओडिशामधील पिपली या जागांवर विविध कारणांमुळे निवडणूक होऊ शकली नव्हती. यामध्ये उमेदवारांचा निवडणूक प्रचारादरम्यान मृत्यू झाला होता.
—–
भारतानं तगडं आव्हान दिलं, परंतु इंग्लंडकडूनही जबरदस्त प्रत्युत्तर मिळालं!

भारतीय संघानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताविरुद्ध आतापर्यंत कोणत्याच संघाला चौथ्या डावात एवढे मोठे लक्ष्य पार करता आलेले नाही. पण, फलंदाजांसाठी पोषक बनलेल्य़ा खेळपट्टीवर इंग्लंडचे सलामावीर चिटकून बसले. रोरी बर्न्स व हसीब हमीद यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून देताना विराट कोहलीचं टेंशन वाढवलं. दिवसअखेर इंग्लंडची एकही विकेट पडलेली नाही आणि आता पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे.

भारताकडून दुसऱ्या डावात रोहित शर्मानं १२७ व लोकेश राहुलन ४६ धावा करत चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर चेतेश्वर पुजारानं ६१ धावा करताना रोहितला तोलामोलाची साथ दिली. विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकापासून वंचित रहावे लागले असले तरी त्याच्या ४४ धावांच्या खेळीनं टीम इंडियाला मजबूती दिली. चौथ्या दिवशी रिषभ पंत ( ५०) व शार्दूल ठाकूर ( ६०) यांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चेहऱ्यावरील हास्य हिरावून घेतेल. टीम इंडियानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. india vs england 4th test, india vs england 4th test live

हसीब हमीद व रोरी बर्न्स यांनी इंग्लंडला दुसऱ्या डावात पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून दिली. खेळपट्टीनं गोलंदाजांना साथ देणं सोडल्यामुळे इंग्लंडचे फलंदाज त्रास देतील याची जाण विराटलाही होतीच. त्यामुळे त्यानं फिरकीपटू रवींद्र जडेजाला लवकर पाचारणं केले. खेळपट्टीनं चेंडू फिरकी घेण्यास त्याला मदत केली, परंतु हमीद व बर्न्स जोडीनं संयमानं त्याचा सामना केला. हमीद ४३ धावांवर असताना मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर LBW अपील झालं, परंतु मैदानावरील पंचांनी नाबाद देताच विराटनं DRS घेतला. पण, त्याचा हा निर्णय चुकला आणि एक DRS वाया गेला.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं बिनबाद ७७ धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी २९१ धावा करायच्या आहेत. हमीद ४३, तर बर्न्स ३१ धावांवर खेळत आहेत

रोहित व चेतेश्वर दुखापतग्रस्त…
शतकवीर रोहित शर्मा व अर्धशतकवीर चेतेश्वर पुजारा हे दोघंही चौथ्या दिवशी मैदानावर क्षेत्ररक्षणाला उतरलेले नाहीत. रोहित शर्माच्या डाव्या गुडघ्यात दुखापत झालीय, तर पुजाराच्या पायाच्या घोटा दुखावला आहे. त्यामुळे त्यांनी विश्रांती घेतली आहे. त्यांच्या ऐवजी मैदानावर सूर्यकुमार यादव आणि मयांक अग्रवाल स्लीपमध्ये उभे राहिलेले दिसत आहेत. बीसीसीआयनंही यामागचं कारण सांगितल आणि ते ऐकून चाहत्यांचं टेंशन वाढलं आहे. इंग्लंडच्या वेगवाना गोलंदाजांचा मार आपल्या मांडीवर झेलून रोहित तिसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी यजमानांना भिडला. त्याला होणाऱ्या वेदनेची जाणीव करून देणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.