मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतून वगळण्यात आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीतूनच राजू शेट्टी यांचा राजकीय गेम करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं सांगत हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

चर्चा का होत आहेत?

राजू शेट्टी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाने खचून न जाता शेट्टी यांनी शेतकऱ्यांची आंदोलने सुरूच ठेवली. मधल्या काळात त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर घेण्याचं ठरलं. मात्र, सहा महिने झाले तरी राज्यपालांनी विधानपरिषदेच्या सदस्याांची यादी मंजूर केली नाही. त्यामुळे नियुक्त्या रखडल्या. मात्र, या कालावधीत विधान परिषदेवर जाण्याची वाट न पाहता शेट्टी यांनी आपली आंदोलने सुरूच ठेवली. शेतकऱ्यांच्या हमीभावापासून ते पूरग्रस्तांना न्याय मिळून देण्यापर्यंत त्यांनी आंदोलन करत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ढवळून काढला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने त्यांचा पत्ता कापला असावा अशी चर्चा आहे.

अधिक वाचा  शेतमालाची ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत १२४५ ठिकाणी विक्रीव्यवस्था

राष्ट्रवादीच्या गडात आव्हान?

राजू शेट्टी यांनी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनाचा धडका लावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढताना दिसत आहे. शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह वाळवा, शिराळा तालुक्यात आक्रोश मोर्चे काढून थेट सरकारलाच अंगावर घेतलं आहे. शिवाय त्यांनी कोल्हापुरात परिक्रमा यात्रा सुरू करून सरकारच्या अडचणीत वाढ केली आहे. ऊसापासून ते पूरग्रस्तांच्या विषयांपर्यंत प्रत्येक विषयावर शेट्टींनी सरकारला घेरलं आहे. या शिवाय साखर सम्राटांच्या विरोधातही आंदोलने करून त्यांनी थेट राष्ट्रवादीलाच आव्हान दिलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तंबूत खळबळ उडाली असून त्यामुळेच राष्ट्रवादीतील पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या दबावामुळे 12 सदस्यांच्या यादीतून त्यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे.

अधिक वाचा  पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण; निर्बंध लादणार का? आयुक्त म्हणाले…

दादांनी आरोप फेटाळले

राष्ट्रवादीने स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. “आम्ही पहिली 12 नावं मंत्रिमंडळाने दिली. असं बोललं जाते की नजिकच्या निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर त्याला नेमलं जात नाही अशी नवी माहिती पुढे आली आहे. यात तथ्य आहे का याची शहानिशा आम्ही करतोय. जर का अडचण आली तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. मात्र अरुण जेटलींचा पराभव झाल्यानंतर त्यांना नरेंद्र मोदींनी राज्यसभेवर घेतलं होतं” असं अजित पवार म्हणाले. राजू शेट्टी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना आता विधानपरिषदेवर घेता येतं की नाही, याबाबतचा नियम आता महाविकास आघाडीकडून तपासला जात आहे.

अधिक वाचा  भाजपवाल्यांच्या माझ्याकडे सीडी, लावल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही : मलिक

जेटलींना कसं घेतलं?

याबाबत अजित पवार म्हणाले, “नाव बदललं ही चर्चा मी माध्यमात बघितली. नजिकच्या काळात पराभूत झालं तर नियुक्त केले जात नाही असे म्हणतात. पण अरुण जेटली पराभूत झाले तेव्हा त्यांना मोदी सरकारने राज्यसभेवर घेतलं. राज्यपाल नियुक्त करता येत नाही असं आम्हाला सांगण्यात आले, ते आम्ही तपासतो आहे”