पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं आहेत. परिणामी मागील चार-पाच दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मराठवाड्यातही अनेक ठिकाणांना पावसानं झोडपून काढलं आहे. यानंतर आजही राज्यात पावसाची स्थिती कायम आहे. आज राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांना हवामान खात्यानं (IMD alerts) हाय अलर्ट जारी केला आहे.

आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर अशा एकूण पंधरा जिल्ह्यांना आज हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. संबंधित जिल्ह्यांत पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे.

अधिक वाचा  राज्याच्या हवाई निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप ; नियम सुसंगतीची सूचना

पुढील पाच दिवस राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. दरम्यान पूर्व महाराष्ट्राकडून पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस सरकणार आहे. तर 6 आणि 7 सप्टेंबर रोजी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 6 सप्टेंबर रोजी रायगड आणि रत्नागिरी तर 7 सप्टेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे दरम्याच्या दोन दिवसांत कोकणातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

उद्यापासून 4 दिवस पुण्याला झोडपणार पाऊस

मागील चार पाच दिवसांपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली असली, तरी पुण्यात अपेक्षित पाऊस कोसळला नाही. दरम्यान अनेक ठिकाणी रिमझिम आणि हलक्या पावसानं हजेरी लावली आहे. आज पुण्यात अंशत: ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पण उद्यापासून पुढील चार दिवस संपूर्ण पुणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून पुढील चारही दिवस पुण्यात येलो अलर्ट जारी केला आहे.