पुणे : सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. पुणे म्हणजे उत्सव आणि संस्कृतीचं माहेरघर पुण्यातल्या सार्वजनिक गणोशोत्सवाला मोठा इतिहास आहे. तसा इथल्या उपक्रमांनाही मोठं महत्व आहे. त्यामुळे गणेशोत्सवावर इतर निर्बंध घालण्यात आलेले असले तरी गणेश उत्सव मंडळासमोर ढोल पथकांना स्थिर वादन करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी गणेश मंडळांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

‘पाच जणांना स्थिर ढोल वादनाची परवानगी द्या’

पुण्यातल्या गणेश मंडळांच्या एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आहे. यामध्ये गणेश उत्सव मंडळासमोर ढोल पथकांतल्या पाच जणांना स्थिर वादन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच उच्च न्यायालयाने निर्देश केल्याप्रमाणे गणेश मंडळांना त्यांच्या परिसरात जाहिरात कमान टाकण्याची परवानगी द्यावी, आणि 2016 साली मान्य नियमाप्रमाणे रनिंग मंडप परवानगी द्यावी, या मागण्याही करण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  किरण गायकवाड ‘देवमाणूस २’मध्ये दिसणार कि नाही?

साधेपणाने उत्सव साजरा करण्याचं आवाहन

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखावे न करता साधेपणाने उत्सव साजरा करावा असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे. यासोबतच मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवत भाविकांची गर्दी टाळण्यासाठी दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी असंही पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. यासोबतच पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी आचारसंहिताही तयार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी आपल्या मागण्यांचं निवेदन पोलीस आयुक्तांना दिलं आहे.

पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी आचारसंहिता

गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांकडून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाही पुणेकरांना सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. पोलिसांनी आचारसंहितेत नमूद केल्याप्रमाणे गणेशमूर्ती खरेदी, प्रतिष्ठापना, दर्शन, आणि विसर्जनबाबत मंडळांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच श्रीं’च्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी विविध उपक्रम, शिबीरे आयोजित करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अधिक वाचा  IND vs NZ 2ndTEST: ३ खेळाडू ‘आऊट; कोहलीचे संघात पुनरागमन'

पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांचा मोठा निर्णय

सप्टेंबर महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्यामुळे पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाविकांना गणपतीचे दर्शन घेता यावे यासाठी फेसबुक व इन्स्टाग्रामसह अन्य व्यासपीठांवर ऑनलाईन स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. पुण्यातील मानाच्या आणि प्रतिष्ठित गणपती मंडळांना दरवर्षी लाखो भाविक भेट देतात.

मात्र, कोरोनाच्या निर्बंधांमुळे सलग दुसऱ्यावर्षी भाविक लाडक्या गणरायाच्या दर्शनाला मुकण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व प्रतिष्ठित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गणपतीचे दर्शन भाविकांना ऑनलाईन घेता येईल, यासाठी खास सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.