पुणे : गणेशोत्सवादरम्यान राज्यातील रुग्णसंख्या वाढीची टांगती तलवार कायम राहणार आहे. यामुळे नागरिकांना अलर्ट राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईसह पुण्यात कोरोना रुग्णवाढीची भीती आहे. त्यामुळे पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर संस्थापकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच होणार असल्याचं समोर आलं आहे. पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडीत सलग दुसऱ्या वर्षी मंडप न उभारण्याचा निर्णय संस्थेकडून घेण्यात आला आहे. दहा दिवस मंडळाचे विश्वस्त आणि कार्यकर्ते मंदिरात जाणार नाहीत. तर ऑगमेंटेड रियालिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन घरबसल्या गणेश भक्तांना दर्शन मिळावं याची तरतूद करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  ठाकरे सरकारच्या सत्तेतील 2 वर्षांत भाजपा ने काय केले अन काय मिळवलं?

यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचं 129 वर्ष आहे. मात्र कोरोनाचा धोका असल्याने शहरातील विविध गणपती मंडळांवर बरेच निर्बंध घालण्यात आले आहेत. दगडूशेठ गणपती मंदिरात प्रवेश न करता बाहेरुनच भाविकांना दर्शन घेता येणार आहे. हार, फुले, पेढे, नारळ आदी वस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्यांनी याबाबत अलर्ट राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.