विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्‍त 12 आमदारांच्या नियुक्‍तीसंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यपाल कोश्‍यारी यांनी ठोस काहीही निर्णय न घेता मागणीचा विचार करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली. यामुळे अद्यापही तिढा कायम असल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजभवनावर जावून राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला भेटण्याचे निमंत्रण दिले होते.

या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 8 महिने होऊनही अद्याप राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीवर काही निर्णय घेतला नाही. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती राज्यपालांना भेटून करण्यात आली. दुसरीकडे राज्यपालांना राज्यात काय सुरू आहे त्याची माहिती दिली गेली. सध्या पाउस आणि धरण स्थितीबद्दल माहिती देत चर्चा करण्यात आली. याशिवाय शिफारस केलेल्या 12 नावांबद्दल निर्णय घ्यावा अशी विनंती केली, असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  काँग्रेस स्थानिक निवडणुका स्वबळावरच लढवणार- नाना पटोले यांचे आदेश.

दरम्यान, मागील नऊ महिन्यांहून अधिक काळापासून 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा पेच प्रलंबित असून नोव्हेंबर 2020 रोजी राज्यमंत्रीमंडळाकडून 12 आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना पाठवण्यात आली होती. मात्र अजूनही त्यावर काही तोडगा निघाला नाही आहे. यादरम्यान राज्यपाल नियुक्ती 12 आमदारांबाबात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच यावरून राज्यातील विविध भागात 12 सदस्य नियुक्त प्रलंबित राहिल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्यावर सर्व स्तरावरून टीका झाली होती.