पुणे : देशात नैसर्गिक ऊर्जा साधनांपासून वीजनिर्मितीसाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये सौरऊर्जेला प्राधान्य दिलं जात आहे. सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी विविध योजनाही राबवल्या जात आहेत. त्यात आता केंद्र सरकारनं आणखी एक महत्वाची योजनी आणली आहे. यामध्ये छतावर सौरऊर्जा निर्मिती यंत्र बसवण्यासाठी 40 टक्के अनुदान दिलं जाणार आहे. या योजनेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत करणं शक्य होणार आहे. तसेच नेट मीटरिंगद्वारे शिल्लक राहणारी वीज वर्षाअखेर ‘महावितरण’कडून खरेदी केली जाणार आहे.

केंद्र सरकार देणार 40 टक्के अनुदान

केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी 25 मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा दौरा ठरला: अयोध्येसह हे ही नियोजन- नांदगावकर

यात घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅटपर्यंत 40 टक्के आणि 3 किलोवॅटपेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सामुहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था आणि निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळणार आहे.

किती असणार किंमत?

पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी 1 किलोवॅट – 46 हजार 820 रू., 1 ते 2 किलोवॅट – 42 हजार 479रू., 2 ते 3 किलोवॅट – 41 हजार 380 रू., 3 ते 10 किलोवॅट – 40 हजार 290 आणि 10 ते 100 किलोवॅटसाठी 37 हजार 020 रुपये प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच या दराप्रमाणे 3 किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची किंमत 1 लाख 24 हजार 140 रुपये असेल. त्यामध्ये 40 टक्के अनुदानाप्रमाणे 49 हजार 656 रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल आणि संबंधित ग्राहकास प्रत्यक्षात 74 हजार 484 रुपयांचा खर्च करावा लागेल.

अधिक वाचा  पाणी कपातीचा विचार नाही; उलट फडणवीसांच्या काळातच पाणी कपात झाली!

वीजबिलात दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत

रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा 100 युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत होऊ शकेल. तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदा संबंधीत घरगुती ग्राहकांना होणार आहे.

खर्चाची साधारणतः 3 ते 5 वर्षात परतफेड

सोबतच सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः 3 ते 5 वर्षात परतफेड होणार आहे. दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौर ऊर्जा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

अधिक वाचा  कर्नाटकात ओमिक्रॉन : 2 आठवडे भारताला महत्त्वाचे- आरोग्य तज्ज्ञ

कुठे करणार अर्ज?

महावितरणने रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजंन्सीजची नियुक्ती केली आहे. त्याची यादी आणि ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.