पुणे महापालिकेता 2017 मध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या 11 गावांच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी महानगरपालिकेच्या स्थायी समितीने 323 कोटींच्या कामांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या अकरा गावांमध्ये मैलापाणी वहन, मैलापाणी शुद्धिकरण केंद्र उभारणे आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. या कामांच्या निविदांवरून गेल्या महिनाभरात अनेकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. मात्र, आता स्थायी समितीत कुठलीही चर्चा न करता या कामांना मान्यता देण्यात आली आहे.

प्रकरण न्यायालयात, तरीही प्रस्तावाला मान्यता

या प्रकल्पासाठी विशिष्ठ ठेकेगदारांना समोर ठेवून अटी आणि शर्ती टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या कामांची निविदा उघडण्यापूर्वी कोणत्या ठेकेदाराला काम मिळणार हे जाहीर करण्यात आले होते. त्याच ठेकेदाराला प्रत्यक्षात काम देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी म्हणजेच ६ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही स्थायी समितीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

अधिक वाचा  अमेरिकेत कोरोना उच्छाद : शाळा उघडल्याने मुलांचा वाढता आकडा

प्रकल्पात मलवाहिन्या, दुरूस्तीची कामं

पुणे महापालिका प्रशासनाने 2017 मध्ये समाविष्ठ करण्यात आलेल्या गावांमध्ये मैलापाणी शुद्धिकरणाच्या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला होता. त्यानुसार मैलापाणी गोळा करण्यासाठी 111 किमीच्या मलवाहिन्या आणि 57 किमीच्या मुख्य मलवाहिन्या टाकण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यासोबतच सध्या अस्तित्वात असलेल्या 14 किमीच्या मलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या कामांसाठी अनुक्रमे 100 कोटी 63 लाख, 101 कोटी 8 लाख आणि 13 कोटी 37 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

कंत्राटदार कंपनीने कमी दराने भरल्या निविदा

मांजरी बुद्रुक इथं 93.50 एमएलडी आणि केशवनगर इथे 12 एमएलडी मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी 177 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार 392 कोटी रूपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, कंत्राटदार कंपनीने कमी दराने निविदा भरल्या आहेत. त्यानुसार 323 कोटी 47 लाख रुपयांच्या निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आल्या होत्या. या निविदांना सर्वपक्षीयांनी मान्यता दिली आहे. उघडण्यात आलेल्या निविदा पुन्हा मूल्यांकन समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत. या समितीने मान्यता दिल्यानंतर त्या अंतिम मान्यतेसाठी स्थआयी समितीसमोर सादर करण्यात येणार आहेत.

अधिक वाचा  इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीत कोरोनाची तिसरी लाट; पोर्तुगाल, झेक रिपब्लिकमध्ये आणीबाणी

या गावांना नव्या प्रकल्पाचा लाभ

2017 मध्ये शिवणे, उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खूर्द, आंबेगाव बुद्रुक, उंड्री, उरूळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा, हडपसर आणि लोहगाव या गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला होता. या गावांसाठी हा मलनिस्सार प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी खिलारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि एस. ए. इन्फ्रा या ठेकेदारांकडून काम करून घेण्यास मंजूरी देण्यात आली आहे.