नाशिक: शिवसेना नेते अनिल परब आणि शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत भाजपने समाधान व्यक्त केले होते. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तसेच आता यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा नंबर असल्याचे मोठे विधान केले होते. याला आता छगन भुजबळ प्रत्युत्तर दिले असून, किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमध्ये काडीमात्र तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये येऊन आधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यानंतर किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. भुजबळ ज्या नऊ मजली इमारतीत राहतात, त्या इमारतीशी तुमचा संबंध काय हे भुजबळांनी स्पष्ट करावे, अशी मागणी करत तुम्ही तुमच्या परिवारासोबत ज्या महालात राहता, तो महाल उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा कुठून आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी केले.

अधिक वाचा  घेरा सिंहगड गरिबांच्या संसारांवर वन विभागाचा हातोडा; धनदांडग्यांना अभय

फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न

ते घर जुने होते. पुनर्बांधणीच्या स्किममधली ती इमारत आहे. ते पाडून त्यावर २.५ एफएसआय मिळतो. त्या इमारतीचे अर्ध माळे मूळ मालकाला आणि अर्धे आम्हाला राहणार आहेत. हा फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न केला गेला आहे. या आरोपांमध्ये काडीमात्र तथ्य नाही. खरेतर चार ते पाच वर्षापूर्वीच त्यांनी आमच्यावर आरोप केले. ईडीला कळवले. प्रॉपर्टीज अटॅच करायला लावल्या. ही दाखवलेली जमीन नाशिकपासून २० किमी लांब आणि १९८० मध्ये घेतलेली आहे. या सगळ्याबाबत आता सेशन कोर्ट आणि हायकोर्टात केस सुरू आहे. म्हणूनच हा दबाव टाकण्याचा त्यांचा हेतू आहे का? पण, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. आम्ही लढत राहू, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  विधानपरिषद निवडणुकांचं गणित ठरलं; सहा पैकी चार जागा बिनविरोध

आम्ही पण काहीतरी काम धंदा केला आहे ना

माझं वय ७५ आहे. त्यावेळी आम्ही १० हजार, १५ हजार रुपये एकराने घेतलेल्या जागा आहेत. त्या जागांचा भाव आता वाढला आणि ते आता तुम्ही सांगता. आम्ही ७५ वर्षे काय घरातच बसलो होतो का बोळ्याने दूध पित? आम्ही पण काहीतरी काम धंदा केला आहे ना. अजूनही आमचे काही व्यवसाय सुरू आहेत. पण आम्ही तुमच्यासारखे खोटे बोलून, खोटे आरोप करुन बाकीचे धंदे केले नाहीत आम्ही. वारेमार आरोप करायचे हे तुमचे कामच आहे. याविषयी जास्त बोलणार नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

अधिक वाचा  कतरिनाच्या नात्याला नवी ओळख...; 'NO' मोबाईल महत्त्वाचा नियम

दरम्यान, ईडीच्या लिस्टमधील १२वा खेळाडू कोण, असा प्रश्न किरीट सोमय्या यांना विचारण्यात आला. त्यावर लिस्टमधला १२वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे, असे मोठे विधान सोमय्या यांनी केले. तसेच यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.