काबूल- 20 वर्षाच्या दीर्घ संघर्षानंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपले सैन्य परत बोलावलं आहे. अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तान सोडलंय. त्यामुळे अफगाणिस्तान अधिकृतरित्या अमेरिकी लष्कराच्या वर्चस्वापासून मुक्त झाला आहे. अमेरिकेच्या सैन्य वापसीमुळे तालिबानने आनंद व्यक्त केलाय. तालिबानने म्हटलंय की, अफगाणिस्तान आता पूर्णपणे स्वतंत्र झाला आहे. तालिबानकडून या क्षणाचा जल्लोष साजरा करण्यात आला. आकाशात आतशबाजी आणि हवेत बंदुकीच्या गोळ्या चालवण्यात आल्या.

तालिबानचे प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद यांनी मंगळवारी म्हटलं की, ‘अमेरिकी सैनिकांनी काबूल विमानतळ सोडलं आहे आणि आमच्या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं आहे.’ अमेरिकी अधिकाऱ्यांनीही याची पुष्टी केली आहे. अमेरिकेने डेडलाईन संपण्याआधीच अफगाणिस्तान सोडलंय. काही दिवसांपूर्वीच तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला आहे. आता अमेरिकेने सैन्य परत बोलावले असल्याने तालिबानने जल्लोष केला. फटाके फोडण्यात आले आणि हवेत गोळ्या चालवण्यात आल्या.

अधिक वाचा  पाणी कपातीचा विचार नाही; उलट फडणवीसांच्या काळातच पाणी कपात झाली!

अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तान सोडले. त्यानंतर राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षांपासून उपस्थित असलेले सैन्य आता परत आले आहे, असं ते म्हणाले. बायडेन यांनी आपल्या सैन्य कमांडरांचे आभार मानले. कोणत्याही जीवितहानीशिवाय अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तानमधून सैन्य परतीचे ऑपरेशन पूर्ण केले आहे.

अमेरिकेने 14 ऑगस्टनंतर अफगाणिस्तानमधून जवळपास 1 लाख 23 हजार 000 लोकांना बाहेर काढलं आहे. यात अमेरिकी नागरिक, अमेरिकी सहयोगी आणि अमेरिकेला मदत केलेले अफगाण नागरिक यांचा समावेश आहे. असे सांगितलं जातं की, अमेरिकेचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे एअरलिफ्ट मिशन होते. दरम्यान, अमेरिकेच्या सैन्य वापसीमुळे तालिबानचे बळ अधिक वाढणार आहे. तालिबानला देशात इस्लामी शासन निर्माण करायचं आहे. त्यामुळे महिलांवर अनेक निर्बंध लादले जातील. शिवाय येत्या काळात नागरिकांवरील अत्याचाराच्या घटना वाढलेल्या पाहायला मिळणार आहेत.

अधिक वाचा  पराग अग्रवाल ट्विटरचे नवे CEO ; एकमताने निवड जॅक डोर्सी पायउतार

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे हजारो लोकांनी काबूल सोडून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पायपीट सुरू केली आहे. एएफपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी काबूल विमानतळावर हजारो लोकांनी गोंधळ केला. त्यानंतर अमेरिकी सैन्याने जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. अफगाणिस्तानच्या प्रेसिडेंट पॅलेसवरही ताबा झाला असून राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडला आहे. अफगाणिस्तानचं नाव बदलण्याची शक्यता सुद्धा आहे.