पुणे : शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘समान पाणी पुरवठा’ योजनेच्या सल्लागाराने काम अर्धवट सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेला आता नव्याने सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. दरम्यान, आत्तापर्यंत या योजनेचे केवळ ३५ टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील काम वेळेत करून घेण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. सुमारे १६ कोटी रुपयांचा खर्च देखील वाढणार आहे.

महापालिकेत बराच वाद झाल्यानंतर समान पाणी पुरवठा योजनेचा सल्लागार म्हणून २०११ मध्ये एसजीआय या इटालियन कंपनीची नियुक्ती करण्यात आली. या सल्लागार कंपनीने प्रकल्प आराखडा तयार केला. त्या कामासाठी सुमारे २५ टक्के जादा दराने निविदा आल्याने प्रकल्पाचा खर्च ३५०० कोटींवर गेला होत. ही निविदा वादग्रस्त ठरल्याने रद्द करावी लागली. नव्याने प्रकल्पाचा आराखडा तयार केल्यानंतर याचा खर्च २ हजार ५२१ कोटी इतका झाला. महापालिकेचे १ हजार कोटी रुपये वाचले.

अधिक वाचा  अरविंद केजरीवाल यांना आज दिलासा मिळेल? दिल्ली हायकोर्टात ईडीच्या अटकेविरोधात आज सुनावणी

या प्रकल्पास सल्ला देण्यासाठी एसजीआयची कंपनीला १८ कोटी रपये दिले जाणार होते, आत्तापर्यंत ९ कोटी रुपये शुल्क देण्यात आले आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून या प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला आहे, काम होत नसल्याने कंपनीचा खर्च वाढत चालला आहे. करारातील तरतुदीच्या आधारे महापालिकेला नोटीस देऊन सल्लागार कंपनीने काम सोडले आहे.

‘‘कोरोनाच्या काळात योजनेचे काम होऊ शकले नाही, त्यामुळे सल्लागारास महापालिकेने पैसे दिले नाहीत. या कंपनीचा खर्च वाढत चालल्याने त्यांनी काम थांबविण्याचा निर्णय घेऊन नोटीस दिली होती. पुढील काम करण्यासाठी नवीन सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा काढली जाणार आहे. सल्लागार सोडून गेल्याने महापालिकेचे अधिकारी लक्ष ठेऊन असून, कामावर कोणताही परिणाम होणार नाही.’’

अधिक वाचा  शरद पवारगटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी; यंदा तिरंगी लढती अनिवार्यच? बारामती, माढा, बीडमधून कोण?

                    -अनिरुद्ध पावसकर प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

नगरसेवकांकडून अडवणूकीने डोकेदुखी वाढली

अडीच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबविला जात असताना शहराच्या विविध भागात नगरसेवकांकडून या योजनेच्या कामात अडथळे आणले जात होते. त्यामुळे सल्लागार काम करता येत नसल्याने कामाला उशीर होत गेला. त्यात परत कोरोनामुळे काम करता आले नाही.