मुंबई : भारतीय क्रिकेटमधले द्रोणाचार्य म्हणून ओळख असलेल्या वासू परांजपे यांचं निधन झालं आहे. वासू परांजपे यांच्या निधनाचं वृत्त कळताच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या आयुष्याचा एक भाग आज जग सोडून निघून गेला, असं वाटत आहे. वासू सरांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्वीट सचिन तेंडुलकरने केलं आहे. यासोबतच सचिनने वासू परांजपे यांच्याबाबतचा अनुभवही सांगितला आहे.

‘वासू सर हे मला लाभलेल्या सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक होते. लहानपणापासूनच्या माझ्या क्रिकेटच्या प्रवासाचे ते अविभाज्य भाग होते. तू पहिले 15 मिनीटं बघून खेळ, मग पुढचा पूर्ण दिवस विरोधी टीम तुला बघेल, असं वासू सर मला माझ्या करियरच्या सुरुवातीला मराठीमध्ये सांगायचे. खेळाचं त्याचं ज्ञान, जिवंतपणा आणि विनोदी शैली वाखणण्याजोगी होती. काही महिन्यांपूर्वीच मी त्यांना भेटलो होतो, तेव्हाही त्यांची विनोदी शैली तशीच कायम होती,’ असं सचिन म्हणाला आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीमधील धुसफूस चव्हाट्यावर,महत्त्वाचा नेता नाराज

‘इंदूरमध्ये अंडर-15 नॅशनल कॅम्प सुरू असताना आम्ही रात्री टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचो, तेव्हा आमचे केयरटेकर वासू सरांकडे तक्रार घेऊन गेले, पण वासू सरांनी आमची बाजू घेतली. ती लहान मुलं आहेत आणि खेळणारच, तुम्ही फिल्डिंग का करत नाही? असं त्यांनी केयर टेकरला सांगितलं. अनेक आठवणी आणि हसण्याचे क्षण देऊन ते आम्हाला सोडून गेले आहेत. माझ्यातला एक भागच जग सोडून गेल्याची माझी भावना आहे,’ अशी भावनिक प्रतिक्रिया सचिनने दिली आहे.

कोण होते वासू परांजपे?

मुंबई आणि बडोद्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या वासू परांजपे यांचं 82 व्या वर्षी निधन झालं. क्रिकेटपटू असण्यासोबतच वासू उत्कृष्ट प्रशिक्षकही होते. भारतीय क्रिकेटमध्ये 5 महान खेळाडू तयार करण्यात वासू परांजपे यांनी मोलाची भूमिका बजावली. यातलं सगळ्यात मोठं नाव सुनिल गावसकर यांचं आहे. गावसकर यांना सनी हे नाव वासू परांजपे यांनीच दिलं. गावसकर यांच्याशिवाय दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड , सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांना तयार करण्याचं काम वासू परांजपे यांनी केलं.

अधिक वाचा  ‘एकनाथराव शिंदे, मग मुख्यमंत्र्यांचे अधिकारही मुख्य सचिवांना द्या : अजित पवार

वासू परांजपे यांनी मुंबई आणि बडोद्याकडून एकूण 29 प्रथम श्रेणी सामने खेळले. यामध्ये त्यांनी 785 रन केल्या आणि 9 विकेट मिळवल्या. आपल्या करियरमध्ये त्यांचा 127 रन सर्वाधिक स्कोअर होता, तसंच त्यांनी दोन शतकं आणि दोन अर्धशतकंही केली.

मोठा क्रिकेटपटू ओळखण्याची नजर वासू परांजपे यांच्याकडे होती. त्यांनी राहुल द्रविडला वयाच्या 14 व्या वर्षीच तू भारताकडून खेळशील, पण त्यासाठी विकेटकिंपगपेक्षा बॅटिंगवर अधिक फोकस कर, असा सल्ला दिला होता. परांजपे यांचा हा सल्ला द्रविडनं मानला. त्यानंतर पुढे जे घडले तो इतिहास आहे.