भारतीय जनता पक्षाच्या बैठकीविरोधात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. याप्रकरणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आपला राग व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देशातील तालिबानी कमांडरनी आदेश दिला होता, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. भाजपच्या बैठकीविरोधात निदर्शने करण्यासाठी करनालकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाथीचार्ज केला होता. यामध्ये जवळपास 10 शेतकरी जखमी झाले.

जखमी झालेल्या शेतकऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर भाजप सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना मिळालेल्या वागणुकीमुळे संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी एएनआयशी बोलताना राकेश टिकैत म्हणाले की, देशात सरकारी तालिबान्यांचा कब्जा झाला आहे. देशात सरकारी तालिबानी कमांडर उपस्थित आहेत. या कमांडरची ओळख झाली पाहिजे. ज्यांनी डोके फोडण्याचा आदेश दिला ते कमांडर आहेत.

अधिक वाचा  माझ्या पराभवात 'यांचा' हात ; शशिकांत शिंदे यांचा मोठा आरोप

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, राज्य भाजपचे अध्यक्ष ओम प्रकाश धनखड आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक नियोजित होती. याला विरोध करण्यासाठी शेतकरी निदर्शने करत होते. त्यांना पांगवण्यासाठी शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईवर टीका होत आहे. शेतकरी नेत्यांनी आरोप केलाय की, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी जखमी झालेत. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधात शनिवारी टोल प्लाझा अडवण्यात आला आणि आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे फतेहगड- चंडीगड, गोहाना-पानिपत आणि जिंद-पतियाळा या महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. अंबाला- चंडीगड आणि हिसार- चंडीगड हे महामार्ग देखील ठप्प झाले होते. पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी विविध ठिकाणांवर शेतकऱ्यांनी महामार्गांवरच खाटा, बांबूचे पलंग आडवे टाकून ठिय्या आंदोलन केले होते.