मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नुकतीच सांगता झाली आहे. याआधी राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलेच वादंग माजले होते. या सर्व गोष्टींवर पडत असतानाच आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे. येत्या मंगळवारी परब यांनी ईडी कार्यालयात हजर रहावे असे समन्स बजावण्यात आले आहे.

अनिल परब यांना ईडीची नोटीस

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबद्दलची माहिती खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिलीय. ट्विट करताना आम्ही कायद्यानेच लढू असे सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

अधिक वाचा  इतिहासातील सर्वांत मोठी 41 टक्के वाढ; विलीनीकरणावर कर्मचारी ठाम

ईडीची नोटीस नेमकी कशासाठी ?

अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

संजय राऊत ट्विटमध्ये काय म्हणाले ?

‘ शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू..जय महाराष्ट्र,’ असं संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

अधिक वाचा  आज उद्या रूजू व्हा नाहीतर बडतर्फी", प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना इशारा

राणे कनेक्शनमुळे परबांना ईडी?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापलं होतं. याच मुद्द्याला घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर निदर्शनं तसेच आंदोलनं केली जात होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या अटकेचं नाट्य रंगलं.

यामध्ये परब पोलिसांना सूचना देत असल्याचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला होता. परबांच्या या व्हिडीओच्या आधावरच भाजपने त्यांना कोर्टात खेचण्याची भाषा केली होती. तसेच आम्ही या सर्व गोष्टींचा रितसर बदला घेऊ असं राणे बंधू यांनी सूचक विधान केलेलं होतं. या सर्व घडामोडीनंतर आता परब यांना ईडीची नोटीस जारी करण्यात आली आहे. नारायण राणे यांना अटक होण्यामागे परबांची मोठी भूमिका असल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली नाही ना ? असा प्रश्न आता विचारला जात आहे.